कानपूर - शहरात हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली डॉक्टर अनुष्का हिच्या निष्काळजीपणामुळे एक नव्हे तर २ इंजिनिअरचा जीव गेला आहे. दोन्ही प्रकरणात हेअर ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाची तब्येत खालावली. सातत्याने वेदना आणि सूज समस्या पुढे आली. डॉ. अनुष्का तिवारी हिने उपचारात योग्य काळजी घेतली नाही. त्यातून दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर मृतक व्यक्तींच्या नातेवाईकांनी न्यायाची मागणी करत डॉ. अनुष्का तिवारीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विनितचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर डॉ. अनुष्का तिवारी हिच्यावर आणखी एक गंभीर आरोप लागला आहे. फर्रुखाबाद येथील इंजिनिअर मयंक कटिहारची आई प्रमोदिनी आणि भाऊ कुशाग्र कटिहार कानपूरला पोहचले. कुटुंबानी केलेल्या आरोपानुसार, मयंकने १८ नोव्हेंबर २०२४ साली अनुष्का यांच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले होते. सर्जरीनंतर डॉक्टरांनी केवळ एक गोळी देऊन मयंकला घरी पाठवले. रस्त्यातच मयंकला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. घरी पोहचताच त्याची प्रकृती आणखी खालावली. चेहरा सूजला, डोळही सुजले होते.
मयंक सतत डॉक्टर अनुष्काला फोन करत होता परंतु डॉक्टर सर्व काही ठीक आहे, घाबरण्याची गरज नाही असं सांगत होती. कुटुंबानेही डॉक्टरशी चर्चा केली परंतु तिने ना कुठला सल्ला दिला, ना त्याला कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. मयंकची तब्येत बिघडली, त्याला कार्डियोलॉजिस्टला दाखवा असा सल्ला कुणीतरी कुटुंबाला दिला. त्यानंतर त्याला फर्रुखाबादच्या कार्डिओलॉजिस्टकडे नेले परंतु त्याला हार्टबाबत काही समस्या नसल्याचे सांगितले. १९ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास मयंकचा मृत्यू झाला. डॉक्टर अनुष्काच्या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप आईने केला आहे.
मयंकच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांचे फोन नंबर ब्लॉक केले, उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी मोठी रक्कम घेतली परंतु योग्य उपचार दिले नाहीत असा आरोप करत कुटुंबाने एसपी अभिषेक पांडे यांची भेट घेतली. यापुढे कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी मृत मयंकच्या कुटुंबाने डॉक्टरांविरोधात तक्रार दिली आहे. १५ मार्च २०२५ रोजी पनकी पॉवर हाऊस येथील इंजिनिअर विनीत दुबे याने डॉ. अनुष्का तिवारी हिच्या क्लिनिकवर हेअर ट्रान्सप्लांट केले होते. उपचारात विनीतची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ५६ दिवस कुटुंब अनुष्का तिवारीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी फेऱ्या टाकत होते. अखेर मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला