युवकांचा जीव वाचवण्यासाठी भाजपा आमदारानं समुद्रात उडी मारली; ३ जणांना वाचवले, १ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 09:04 IST2023-06-01T09:04:32+5:302023-06-01T09:04:51+5:30
पटवा गावाच्यानजीक असलेल्या समुद्र किनारी चार मित्र कल्पेश शियाल, विजय गुजरिया, निकुल गुजरिया, जीवन गुजरिया पोहण्यासाठी गेले

युवकांचा जीव वाचवण्यासाठी भाजपा आमदारानं समुद्रात उडी मारली; ३ जणांना वाचवले, १ मृत्यू
अहमदाबाद - गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील राजुला आमदाराचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कारण या आमदाराने समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकांना वाचवण्यासाठी खोल पाण्यात उडी मारली. ज्यामुळे ३ युवकांचा जीव वाचला आहे मात्र या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ४ युवक समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहता पोहता हे चौघे खोल पाण्यात गेले तिथे ते बुडायला लागले.
ही घटना स्थानिकांनी समुद्र किनारी उपस्थित असलेल्या भाजपा आमदार हिरा सोलंकी यांना सांगितली. त्यानंतर आमदारांनी बोटीच्या सहाय्याने युवक बुडत होते तिथे पोहचले. त्यानंतर युवकांचा जीव वाचवण्यासाठी स्वत: आमदारांनी बोटीतून पाण्यात उडी मारली आणि वेळीच ३ युवकांना वाचवले. त्यातील १ युवक सापडला नाही. शोध पथकाने २ तास रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पटवा गावाच्यानजीक असलेल्या समुद्र किनारी चार मित्र कल्पेश शियाल, विजय गुजरिया, निकुल गुजरिया, जीवन गुजरिया पोहण्यासाठी गेले. समुद्राला भरती असल्याने हे चौघे पोहता पोहता खोल पाण्यात गेले आणि तिथे बुडायला लागले. त्यावेळी तिथे स्थानिकांनी आरडाओरड सुरू केली. तिथे आमदारही उपस्थित होते. ज्यांनी तात्काळ पाऊल उचलत वेळीच तीन युवकांचा जीव वाचवला. या घटनेत जीवन गुजरिया नावाच्या युवकाचा पाण्याच बुडल्याने मृत्यू झाला.