"मी थोडा लोभी आहे, मला फक्त जिंकायचं नाहीये..." सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितल्या तुरूंगातील आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:26 IST2026-03-17T18:06:24+5:302026-03-17T18:26:11+5:30
जोधपूर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सोनम वांगचुक म्हणाले की, वैयक्तिक सुटका हा विजय नाही, तर लडाख आणि हिमालयाच्या प्रश्नांसाठीचा खरा लढा अजूनही सुरू आहे.

"मी थोडा लोभी आहे, मला फक्त जिंकायचं नाहीये..." सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितल्या तुरूंगातील आठवणी
लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या विरोधातील आरोप केंद्र सरकारने मागे घेतले. जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका झाली. यानंतर आज त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या वैयक्तिक सुटकेला विजय मानले जाऊ शकत नाही, कारण खरा लढा लडाख आणि हिमालयाच्या प्रश्नांसाठीच आहे.
वांगचुक यांनी आपल्या टीमचे आभार मानत म्हटले, "माझ्या कायदेशीर टीमने प्रत्येक टप्प्यावर मला पाठिंबा दिला आणि मी त्यासाठी त्यांचा आभारी आहे. आम्हाला खात्री आहे की एक दिवस आम्ही जिंकू. पण मी थोडा लोभी आहे. मला फक्त माझा स्वतःचा विजय नको आहे, मला लडाख आणि हिमालयाचा विजय पाहायचा आहे, जो अजून झालेला नाही, असेही वांगचुक म्हणाले.
इच्छामरण म्हणजे काय? २-३ आठवड्यांचा वेळ का लागतो? डॉक्टरांनी उलगडलं 'त्या' शेवटच्या प्रवासाचं सत्य
तुरुंगातील दिवसांची आठवण सांगताना वांगचुक म्हणाले, त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आले. जवळपास १० दिवस त्यांचा त्यांच्या कुटुंबाशी किंवा वकिलांशी कोणताही संपर्क नव्हता. तो अनुभव कठीण होता, त्यांनी त्याचे वर्णन संघर्षाचाच एक भाग असे केले.
वांगचुक यांना १७० दिवस तुरुंगात होते
केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (NSA) अंतर्गत असलेली त्यांची जवळपास १७० दिवसांची नजरकैद रद्द केल्यानंतर वांगचुक यांची सुटका करण्यात आली. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
पत्रकार परिषदेत वांगचुक यांनी सरकार आणि जनता या दोघांनाही लवचिक भूमिका घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "संवाद ही देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांप्रति संवेदनशील आणि व्यावहारिक असले पाहिजे.
चर्चा अनावश्यकपणे लांबवल्यास अर्थपूर्ण तोडगा निघण्यास अडथळा येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांचा संघर्ष वैयक्तिक नसून लडाखचे पर्यावरण, संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे आणि हा लढा सुरूच राहील, असे स्पष्टच वांगचुक यांनी सांगितले.