'ड्रीम अमेरिका' पूर्ण करण्यासाठी ५५ लाख खर्च केले; ८ महिन्यात दोनदा डिपोर्ट झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:09 IST2025-02-17T11:06:45+5:302025-02-17T11:09:03+5:30
अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांच्या दुसऱ्या तुकडीत नवदीपला आणण्यात येणार होते. मात्र तो आजारी पडला त्यामुळे तिसऱ्या तुकडीत त्याला भारतात आणण्यात आले असं त्यांनी सांगितले.

'ड्रीम अमेरिका' पूर्ण करण्यासाठी ५५ लाख खर्च केले; ८ महिन्यात दोनदा डिपोर्ट झाला
नवी दिल्ली - अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनाभारतात पाठवण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी अमेरिकेतून तिसरं विमान भारतात पोहचले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा कारभार हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण ३३२ भारतीयांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आले आहे. 'ड्रीम अमेरिका'चं स्वप्न घेऊन अनेक तरूण लाखो रुपये खर्च करून अवैधरित्या अमेरिकेत पोहचले होते परंतु आता त्या सर्वांना माघारी परतावं लागलं आहे.
पंजाबच्या फिरोजपूर इथं राहणाऱ्या नवदीपची कहाणी अशीच आहे ज्याने अमेरिकेला जाण्यासाठी दोनदा मोठी रक्कम खर्च केली परंतु दोन्ही वेळा नशिबाने त्याला साथ दिली नाही. नवदीपचे वडील काश्मीर सिंह यांनी म्हटलं की, मागील ८ महिन्यात २ वेळा आम्ही त्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी जवळपास ५५ लाख खर्च केले मात्र दोन्ही वेळा नशिबाने साथ दिली नाही. अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांच्या दुसऱ्या टप्प्यात नवदीपला आणण्यात येणार होते. मात्र तो आजारी पडला त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात त्याला भारतात आणण्यात आले असं त्यांनी सांगितले.
वडील चालवतात मिठाईचं दुकान
नवदीपच्या वडिलांचे छोटे मिठाईचं दुकान आहे. त्यांचा मुलगा नवदीप पदवीधर आहे. तो कधी कधी वडिलांच्या कामातही मदत करायचा मात्र मिठाईच्या दुकानात काम करायला त्याला लाज वाटायची. त्याने नोकरी करावी असं त्याच्या घरच्यांना वाटत होते मात्र नवदीपला अमेरिकेत जायचे होते. नवदीपच्या हट्टापायी मागील वर्षी वडिलांनी जमीन विकून ४० लाख रूपये जमा केले होते. नातेवाईकांकडूनही काही पैसे उधारी घेतले होते परंतु पनामा शहरात त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली त्याच्या काही दिवसांनी नवदीपला भारतात डिपोर्ट करण्यात आले.
...अन् पुन्हा अमेरिकेला गेला
पनामा येथून डिपोर्ट झाल्यानंतर नवदीप जवळपास २ महिने घरीच थांबला होता परंतु त्याचे अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण झाले नव्हते. अखेर नवदीपने पुन्हा एजेंटशी संपर्क साधला. यावेळी एजेंटने त्याच्याकडून १५ लाखांची मागणी केली. या रक्कमेचा जुगाड करून नवदीप पुन्हा अमेरिकेला पोहचला होता. परंतु २ महिन्यांनी पुन्हा तीच वेळ आली. २७ जानेवारीला अमेरिकेत नवदीपला ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत नवदीपच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. अमेरिकेतून भारतात आलेल्या तिसऱ्या विमानातून नवदीपला परत पाठवलं आहे. नवदीप हे एकमेव उदाहरण नाही तर अनेकांनी त्यांची घरे, जमिनी विकून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महिन्यातच त्यांच्यावर संकट ओढावलं आहे.