उडी मारली अन् स्टाफच्या बसमध्ये बसून पळाला; दिल्ली विमानातळावरुन ब्रिटिश नागरिक फरार, आठवड्याभरापासून शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:44 IST2025-11-07T13:39:48+5:302025-11-07T13:44:15+5:30
विमान चुकल्यानंतर दिल्ली विमानतळावरुन एका ब्रिटीश नागरिकाने पळ काढला.

उडी मारली अन् स्टाफच्या बसमध्ये बसून पळाला; दिल्ली विमानातळावरुन ब्रिटिश नागरिक फरार, आठवड्याभरापासून शोध सुरु
IGI Airport: देशाची राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मोठ्या सुरक्षा त्रुटीमुळे खळबळ उडाली आहे. बँकॉकहून दिल्लीत आलेल्या एका ब्रिटीश नागरिकाने इमिग्रेशन भागातून अक्षरशः पळ काढला आणि तो फरार झाला. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरी, दिल्ली पोलीस, सीआयएसएफ, इमिग्रेशन विभाग आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना या व्यक्तीचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हा गंभीर प्रकार २८ ऑक्टोबर रोजी घडला. ब्रिटीश नागरिकाचे नाव फिट्ज पॅट्रिक असे आहे. तो एअर इंडियाच्या AI ३३३ विमानाने बँकॉकहून दिल्लीत आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची कनेक्टिंग फ्लाईट लंडनसाठी त्याच दिवशी दुपारी २:१० वाजता होती. मात्र, पॅट्रिक उशिरा पोहोचल्यामुळे त्याची फ्लाईट चुकली आणि त्यामुळे तो संपूर्ण दिवस इंटरनॅशनल टू इंटरनॅशनल पॅसेंजर ट्रान्सफर एरिया मध्येच थांबला. फिट्ज पॅट्रिक रात्रभर याच ट्रान्झिट झोनमध्ये होता. महत्त्वाची बाब म्हणजे, भारताचा व्हिसा नसलेल्या प्रवाशांना या ट्रान्झिट झोनमधून बाहेर पडून शहरात प्रवेश करण्याची परवानगी नसते.
दुसऱ्या दिवशी, २९ ऑक्टोबर रोजी, एअरलाईन कर्मचाऱ्यांनी पॅट्रिक बेपत्ता झाल्याची सूचना दिली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आणि तपासणी सुरू केली. तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. सकाळी सुमारे ७:३० वाजता फिट्ज पॅट्रिकने चक्क अरायव्हल इमिग्रेशन ई-व्हिसा काऊंटरवरून उडी मारली आणि तो थेट अरायव्हल गेट नंबर ४ मधून बाहेर पडून शहराच्या दिशेने फरार झाला. पुढील तपासात, तो एअर इंडियाच्या स्टाफ फेरी बसमध्ये बसून शहरात जाताना दिसला.
सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची माहिती दिली आहे. मात्र, एक आठवड्याहून अधिक काळ उलटूनही हा ब्रिटीश नागरिक अजूनही बेपत्ता आहे. या व्यक्तीकडे ट्रान्झिट क्षेत्रातून बाहेर पडून दिल्लीत प्रवेश करण्यासाठी वैध भारतीय व्हिसा होता की नाही, हेही सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले नाही. तसेच, त्याचे सामान सापडले आहे की नाही आणि त्यात काही संशयास्पद वस्तू होत्या का, याबाबतही अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. देशातील सर्वात महत्त्वाच्या विमानतळावरील या गंभीर सुरक्षा त्रुटीमुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.