Officer Died by Suicide: भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे शासकीय बंगल्याच्या छतावर जाऊन अधिकाऱ्याने खाली उडी मारून आयुष्य संपवले. पोलिसांनी केलेल्या तपासातून काही माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुले डेहरादून येथे राहतात.
दिल्लीतील चाणक्यपुरी भागात भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे निवासस्थाने आहेत. एका बंगल्यात आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत हे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (७ मार्च) पहाटे ६ वाजता जितेंद्र रावत हे बंगल्याच्या छतावर गेले. त्यानंतर त्यांनी उडी मारून आत्महत्या केली.
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत केली जाईल. अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांचा आणि दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
जितेंद्र रावत यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांच्या खोलीचीही तपासणी करण्यात आली. कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. दरम्यान, जितेंद्र रावत हे गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होते आणि ते उपचार घेत होते.
ते सध्या बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची आई राहत होती. त्यांची पत्नी आणि दोन मुले डेहरादून येथील घरी राहतात. रावत यांनी आत्महत्या केली, तेव्हा त्यांची आई घरात होती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.