लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लष्कराच्या जज ॲडव्होकेट जनरल (जेएजी-विधि) शाखेत ५०-५० निवडीच्या मानदंडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सवाल केला आहे की, भारतीय वायूदलात एखादी महिला राफेल लढाऊ विमान उडवू शकते, तर लष्कराच्या जेएजी शाखेत महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी का आहे?
न्या. दीपांकर दत्ता व न्या. मनमोहन यांच्या पीठाने ८ मे रोजी दोन अधिकारी अर्शनूर कौर व आस्था त्यागी यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली व क्रमश: चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला होता. परंतु, महिलांसाठी कमी जागा असल्यामुळे जेएजी विभागात त्यांची निवड होऊ शकली नाही.
यावर पीठाने म्हटले आहे की, आम्ही निर्देश देत आहोत की, नियुक्तीसाठी पुढील प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांना सहभागी करण्याच्या उद्देशाने जी काही कारवाई आवश्यक असेल, ती सुरू करावी.