भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 23:20 IST2025-08-03T23:19:45+5:302025-08-03T23:20:43+5:30
Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.

भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर भगवा दहशतवाद या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. दहशतवादाला रंगाशी जोडण्याच्या या वादावर बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. "दहशतवादी हा दहशतवादीच असतो. भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार आहात का?", असा सवाल त्यांनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माध्यमांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "दहशतवादाला कोणताही रंग नसतो, तो दहशतवादच असतो. दहशतवादी येतात आणि घटना घडवून निघून जातात. तुम्ही दोषींना शोधू शकत नाही. मुंबईत ७ बॉम्बस्फोट झाले, पण तुम्ही आरोपींना शोधू शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, तुम्हाला आरोपी शोधता आले नाही", असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद यांनी तपास यंत्रणा आणि सरकारच्या भूमिकेवरच सवाल केला.
अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, दहशतवादाला रंग देणार पक्षपाती
"जेव्हा दहशतवाद्यांना शोधण्याचा मुद्दा येतो, तेव्हा स्वतःच्या उणीवा लपवल्या जातात आणि मग दहशतवादामध्ये रंग शोधत बसतात. रंग आयुष्याचा असतो. मेल्यानंतर तुमचे डोळे रंग बघत नाहीत. जे लोक दहशतवादामध्ये रंग शोधत असतात, ते दहशतवादाबद्दल पक्षपाती आहेत", असे खडेबोल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राजकारण्यांना सुनावले.
"बॉम्बस्फोट आपोआपच झाले नसतील ना? कोणतीतरी बॉम्बस्फोट केले असतीलच ना? मग ते कोण आहेत? त्यांना शोधण्यामध्ये भारत सरकार, राज्यातील सरकार अयपशी ठरले आहे. कोणीतरी येतो आणि बॉम्बस्फोट करून निघून जातो मग आम्ही वेळ देऊन आणि पैसा खर्च करूनही त्यांना शोधू शकत नाही. हे म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर मोठी थापड बसण्यासारखेच आहे", असा संताप शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केला.