"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:01 IST2025-07-29T18:58:19+5:302025-07-29T19:01:26+5:30
Rahul Gandhi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित केल्या. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून आव्हान दिले.

"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi on PM Modi: "हवाई हल्ला केल्यानंतर सरकारने आधीच पाकिस्तान सरकारसमोर शरणागती पत्करली. कारण या हवाई हल्ल्यांचा उद्देश फक्त पंतप्रधानांची प्रतिमा सुधारणे हाच होता. पहलगाममध्ये लोकांच्या हत्यांचे रक्त त्यांच्या हाताला लागले होते, त्यामुळे हवाई दलाचा वापर करून त्यांची प्रतिमा सुधारण्यात आली", असा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान केले. "पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्केही हिंमत असेल, तर त्यांनी संसदेत सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत आणि त्यांनी हा संघर्ष थांबवला नाही", असे आव्हान राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ वेळा सांगितले की, मी शस्त्रसंधी केली. अच्छा. मग जर ते खोटं बोलत आहेत, तर पंतप्रधानांनी इथे आपल्या भाषणात सांगावं की, ते खोटं बोलत आहेत."
"इथून सांगा की डोनाल्ड ट्रम्प तुम्ही खोटारडे आहात"
"जर तुमच्यामध्ये हिंमत असेल, तर इथे पंतप्रधानांनी बोलावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. जर त्यांच्यात ते धाडस असेल... जर त्यांच्यामध्ये इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर त्यांनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही शस्त्रसंधी नाही केली आणि आम्ही एकही लढाई विमान गमावलेले नाही", अशा शब्दात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, "इंदिरा गांधींच्या तुलनेत तुमच्यात ५० टक्के जरी हिंमत असेल, तर पंतप्रधान इथे बोलतील. डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. ते खोटं बोलत आहेत", असे राहुल गांधी म्हणाले.
"पाकिस्तानचा निषेध एकाही देशाने केला नाही"
राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "परराष्ट्र मंत्री म्हणाले की, सर्व देशांनी दहशतवादी घटनेचा निषेध केला आहे. हे शंभर टक्के खरं आहे. पण, त्यांनी हे नाही सांगितलं की पहलगामनंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही. एकही देश नाही, ज्याने पाकिस्तानचा निषेध केला असेल. याचा अर्थ काय आहे की, जग भारताला पाकिस्तानच्याच पातळीवर बघत आहे", अशी टीका राहुल गांधींनी केली.