"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:07 IST2025-12-08T14:07:00+5:302025-12-08T14:07:44+5:30
विमानतळावर पाच दिवसांपासून फ्लाइट रद्द होण्याचं सत्र सुरू असतानाच, एका प्रवाशाला जीव गमवावा लागला आहे.

"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
विमानतळावर पाच दिवसांपासून फ्लाइट रद्द होण्याचं सत्र सुरू असतानाच, एका प्रवाशाला जीव गमवावा लागला आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, एअरपोर्टवर तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थेवर आणि एअरलाईनच्या मनमानी कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तणावात असलेल्या प्रवाशाचा 'वेटिंग'मध्येच मृत्यू
कानपूरच्या कल्याणपूर भागातील रहिवासी असलेले ४६ वर्षीय अनूप कुमार पांडेय हे कोका-कोला कंपनीत सेल्स झोनल हेड म्हणून कार्यरत होते आणि ते बंगळूरु येथे कुटुंबासोबत राहत होते. पाच दिवसांपूर्वी ते एका नातेवाइकाच्या तेराव्यासाठी कानपूरला आले होते. शुक्रवारी रात्री ते 'एअर इंडिया'च्या विमानाने दिल्लीमार्गे बंगळूरुला परतणार होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंडिगो कर्मचाऱ्यांचा संप आणि खराब हवामानामुळे लखनऊ विमानतळावरील विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. फ्लाईट रद्द होण्याच्या या अनिश्चिततेमुळे अनूप पांडेय प्रचंड तणावात होते. ते विमानतळावर फ्लाईटची वाट पाहत असतानाच, अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तीव्र हार्ट अटॅक आला.
"१० मिनिटांत उपचार मिळाले असते, तर भाऊ वाचला असता!"
अनूप पांडेय यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी विमानतळ प्राधिकरणावर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत. अनूप यांचे मोठे बंधू व वकील अनिल पांडेय यांनी सांगितले, "रात्री ९ वाजता अनूपचे वहिनीसोबत शेवटचे बोलणे झाले. त्यावेळी तो विमानाची वाट पाहत असल्याचे म्हणाला होता. रात्री ११ वाजता लोकबंधु रुग्णालयातून फोन आला की, अनूपला मृत घोषित करण्यात आले आहे."
अनिल पांडेय यांचा आरोप आहे की, विमानतळावर तातडीने उपचार देण्यासाठी कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता आणि त्वरित रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. "जर १० ते १५ मिनिटांत त्याला सीपीआर किंवा प्राथमिक उपचार मिळाला असता, तर माझा भाऊ वाचला असता," असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
अनूप यांच्या पश्चात पत्नी पूजा, ११वीत शिकणारी १७ वर्षांची मुलगी श्रेया आणि हायस्कूलमध्ये असलेला मुलगा पारस असा परिवार आहे. रविवारी पोस्टमॉर्टमनंतर अनूप यांचे पार्थिव कानपूरला आणले असता, संपूर्ण कुटुंबाने टाहो फोडला. प्री-बोर्ड परीक्षा सोडून आलेला मुलगा पारस आणि वडिलांच्या निष्प्राण देहाला मिठी मारून रडणारी मुलगी श्रेया यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
सलग पाचव्या दिवशी फ्लाईट रद्द; प्रवाशांची हेळसांड सुरूच!
अनूप पांडेय यांच्या मृत्यूने विमानतळावरील आरोग्य सुविधांची कमतरता समोर आणली आहे, पण यासोबतच एअरलाईन कंपन्यांच्या मनमानी कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इंडिगोचा संप आणि खराब हवामानामुळे लखनऊ विमानतळावर सलग पाचव्या दिवशी विमानांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तास-न्-तास विमानतळावर ताटकळत राहिलेल्या अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. कोणाचे विदेशात जाण्याचे नियोजन बिघडले, तर अनेकांना हॉटेल आणि टॅक्सीचा अतिरिक्त खर्च सोसावा लागला.
'डीजीसीए'ने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. पूर्वसूचना न देता फ्लाईट रद्द करणे हा प्रवाशांवर अन्याय आहे, तसेच एअरलाईन कंपन्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.