राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:20 IST2025-11-03T14:19:45+5:302025-11-03T14:20:09+5:30
निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी, महामार्ग मंत्रालयाने बांधा-वापरा-हस्तांतरित (बीओटी) करा मॉडेलअंतर्गत बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या एका विभागात एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव व्ही. उमाशंकर म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने बीओटी दस्तऐवजात सुधारणा केली आहे. आता कंत्राटदार अपघात व्यवस्थापनासाठी जबाबदार असतील आणि त्यांनी बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागात निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास सुधारणात्मक पावले उचलली जातील. ते म्हणाले, जर एखाद्या विभागात ५०० मीटरमध्ये एकापेक्षा जास्त अपघात झाले तर कंत्राटदाराला २५ लाख रुपये दंड आकारला जाईल. पुढच्या वर्षी पुन्हा अपघात झाला तर दंडाची रक्कम ५० लाख रुपयांपर्यंत वाढेल. उमाशंकर म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने ३,५०० अपघातप्रवण क्षेत्रे चिन्हांकित केली आहेत.
१.८० लाख अपघाती मृत्यू
- संपूर्ण भारतातील रस्ते अपघातांमधील मृत्यूसंख्या अंदाजे १.८० लाख एवढी आहे. यामध्ये महामार्ग व इतर सर्व रस्त्यांचा समावेश.
- भारतात राष्ट्रीय महामार्ग हे संपूर्ण रस्त्यांच्या २ टक्के आहेत, पण अपघातांमधील मृत्यूंमध्ये त्यांचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा जास्त.
- अपघातांमध्ये दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक.
कशामुळे होतात अपघात?
अतिवेग, वाहनचालकाने चुकीचे वाहन चालवणे, हेल्मेट/सीटबेल्ट न वापरणे व इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात २०२४ मध्ये महामार्गांवर ३६,०८४ अपघात झाले असून, यामध्ये १५,३३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात अपघाती मृत्यूंची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. २०२३ मध्ये देशात एकूण ४.४४ लाख अपघाती मृत्यू झाले असून हा आकडा २०२२ च्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या दशकात (२०१३–२०२३) अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.