पत्नीच्या संमतीशिवाय पतीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर तो गुन्हा नाही -उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:48 IST2025-02-12T13:47:28+5:302025-02-12T13:48:37+5:30
पत्नीच्या संमतीशिवाय पतीने अनैसर्गिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून छत्तीसगड उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

पत्नीच्या संमतीशिवाय पतीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर तो गुन्हा नाही -उच्च न्यायालय
Court Verdict on Unnatural Sex: बलात्कार आणि इतर आरोपांतून छत्तीसगड उच्च न्यायालयाने आरोपी पतीची निर्दोष मुक्तता केली. कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या पत्नीसोबत तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले, मग ते अनैसर्गिक असले, तरी तो गुन्हा ठरवला जाऊ शकत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यायालयाने निर्दोष सुटका केलेल्या व्यक्तीला २०१७ मध्ये अटक करण्यात आले होते. बस्तरमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तत्कालिन भादंवि कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक शारीरिक संबंध) आणि ३०४ च्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.
या निर्णयाला आरोपीने बिलासपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बदलला. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायालयाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. १० फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल सुनावण्यात आला.
न्यायालयाने काय म्हटले आहे?
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या एकल पीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. पीटीआयच्या रिपोटनुसार, न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, "जर पत्नी १५ वर्षांपेक्षा लहान नसेल, तर पतीने पत्नीसोबत ठेवलेल्या कोणत्याही शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवले जाऊ शकत नाही. अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पत्नीची संमती नसणे, जास्त महत्त्वाचे ठरत नाही."
बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला ११ डिसेंबर २०१७ रोजी अटक करण्यात आले होते. त्याच्या पत्नीने कनिष्ठ न्यायाधीशांच्या समोर दिलेल्या जबाबवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचदिवशी पत्नीचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता.