एक प्रश्न अन् UPSC मध्ये सिलेक्शन; स्वतःला दिलेलं IAS होण्याचं वचन, मेहनतीने झाली अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:27 IST2025-02-11T18:26:25+5:302025-02-11T18:27:18+5:30
वैष्णवी पॉलने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२२ मध्ये ६२ वा रँक मिळवून आपल्या पालकांचं आणि जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे.

एक प्रश्न अन् UPSC मध्ये सिलेक्शन; स्वतःला दिलेलं IAS होण्याचं वचन, मेहनतीने झाली अधिकारी
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील वैष्णवी पॉलने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२२ मध्ये ६२ वा रँक मिळवून आपल्या पालकांचं आणि जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे. वैष्णवीने तिचं शालेय शिक्षण गोंडा येथे पूर्ण केलं. यूपीएससीमध्ये हा तिचा चौथा प्रयत्न होता, ज्यामध्ये ती यशस्वी झाली. तिची आई शिक्षिका आहे.
वैष्णवी म्हणाली की, तिने स्वतःला आयएएस होण्याचं वचन दिलं होतं, ज्यामध्ये ती यशस्वी झाली. शिक्षण नेहमीच पुढे ठेवलं पाहिजे. लहानपणापासूनच मी वर्तमानपत्र वाचत होती. जर तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं असेल आणि तुमच्याकडे सपोर्ट सिस्टम असेल तर कठोर परिश्रम करा, घाबरू नका असा सल्ला दिला आहे. वैष्णवीने या यशाचं श्रेय तिच्या पालकांना, शिक्षकांना आणि मित्रांना दिलं आहे.
जिल्ह्यातील फातिमा स्कूलमधून इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतलेल्या वैष्णवीने दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. यानंतर मास्टर्स करण्यासाठी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. यशाबद्दल म्हणाली, मला नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया ६२ वा रँक मिळाला आहे. मी जे करायचं ठरवलं होतं ते करण्याची संधी मला मिळणार आहे याचा मला खूप आनंद आहे.
"लहानपणी माझ्या वडिलांनी मला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली आणि जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र उघडता तेव्हा तुम्हाला बहुतेकदा स्थानिक बातम्या दिसतात, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे केलं, एसपींनी ते केलं याबाबत समजतं. अशा परिस्थितीत माझं मनही या दिशेने गेलं. मग जेव्हा आपण मोठे होतो आणि तुम्हाला गोष्टी दिसतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की, हो तुमच्याकडे एक सपोर्ट सिस्टम आहे, तेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करता आणि प्रशासनाचा भाग बनण्याचा प्रयत्न करता. सुदैवाने, माझ्याकडेही एक सपोर्ट सिस्टम आहे."
"माझे आईवडील, माझी बहीण, माझ्या आईचं कुटुंब, माझे सर्व शिक्षक, माझे सर्व मित्र माझ्यासोबत होते. मुलाखतीत मला बरेच प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये एक चांगला परिस्थितीजन्य प्रश्न होता की, जर तुम्ही जिल्हा दंडाधिकारी झालात आणि पूर्वीच्या डीएमचे तिथल्या एसपीशी चांगले संबंध नसतील तर तुम्ही काय कराल. मी आत्मविश्वासाने उत्तर दिलं की, मी त्यांच्यासोबत सकारात्मक दृष्टिकोनाने नव्याने सुरुवात करेन" असं वैष्णवीने सांगितलं.