इंग्रजी येत नसल्याने खिल्ली उडवली पण 'तिने' हार नाही मानली; IAS बनून दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 19:16 IST2024-08-13T19:09:29+5:302024-08-13T19:16:39+5:30
आयएएस सुरभी गौतम यांना देखील चांगलं इंग्रजी येत नसल्याने अपमान सहन करावा लागला होता. त्यांना याचं खूप वाईट वाटलं पण त्यांची स्वप्नं खूप मोठी होती.

इंग्रजी येत नसल्याने खिल्ली उडवली पण 'तिने' हार नाही मानली; IAS बनून दिलं सडेतोड उत्तर
इंग्रजी आता फक्त एक भाषा राहिलेली नाही तर ती एक स्टेटस सिम्बॉल आणि गरज बनली आहे. आयएएस सुरभी गौतम यांना देखील चांगलं इंग्रजी येत नसल्याने अपमान सहन करावा लागला होता. त्यांना याचं खूप वाईट वाटलं पण त्यांची स्वप्नं खूप मोठी होती. त्यांनी खूप मेहनत करून यश मिळवलं. सुरभी गौतम या मध्य प्रदेशातील सतना येथील एका गावात राहायच्या. लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या.
सुरभी गौतम यांनी दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. कोणत्याही कोचिंगशिवाय फक्त सेल्फ स्टडी करून त्यांनी दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. सुरभी गौतम यांचे वडील सिव्हिल कोर्टात वकील होते आणि आई शिक्षिका होती. त्यांच्या घरी अभ्यास करण्यासाठी चांगलं वातावरण होतं.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभी गौतम यांनी स्टेट इंजिनिअरिंग एंट्रेंस एग्जाम दिली. या परीक्षेत त्यांनी चांगले गुण मिळवले होते. गावातून उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या मुलींमध्ये त्या पहिल्या होत्या. त्या हिंदी मीडियमच्या होत्या. सुरभी यांनी भोपाळ इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केलं. त्या टॉपर होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गोल्ड मेडल देण्यात आलं.
सुरभी गौतम यांच्यासाठी कॉलेजचा पहिला दिवस खूप कठीण गेला. हिंदी मीडियममधून असल्याने त्यांना इंग्रजी भाषा नीट येत नव्हती. नीट इंग्रजी बोलता येत नसल्याने वर्गात त्यांची अनेक वेळा खिल्ली उडवली गेली. कॉलेजच्या पहिल्या दिवशी इंग्रजीत स्वतःची ओळख करून न दिल्याने त्यांची खूप खिल्ली उडवली गेली. पण नंतर आपलं संवाद कौशल्य सुधारण्यासाठी त्यांनी दररोज दहा नवीन इंग्रजी शब्द शिकायचं ठरवलं.
सुरभी गौतम यांनी ISRO, BARC, IES, UPSC IAS, राज्यस्तरीय परीक्षांसह आठ प्रमुख परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी काही काळ BARC मध्ये काम केलं. २०१३ मध्ये सुरभी गौतम यांनी IES परीक्षेत टॉप केलं होतं. त्यानंतर २०१६ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ५० वा रँक मिळवून आयएएस अधिकारी झाल्या आहेत.