छोट्या गावातली मुलगी बनली IAS टॉपर; सरकारी शाळेत शिकली, इंग्रजीवरून लोकांनी केलेली थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 16:11 IST2023-08-20T15:59:49+5:302023-08-20T16:11:18+5:30
सुरभीचा प्रवास मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून सुरू झाला. सुरभीने कंपनीत नोकरी केली आणि नंतर ती सोडून आयएएस अधिकारी बनली.

फोटो - news18 hindi
ग्रामीण भागातून आलेले आणि इंग्रजी नीट येत नसलेले अनेक तरुण-तरुणी निराश होतात. परंतु कठोर परिश्रम करून अशा अडचणींवर मात करता येते. आयएएस अधिकारी होणं देखील अवघड नाही. IAS सुरभी गौतम यांची अशीच प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. सुरभीचा प्रवास मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून सुरू झाला.
सुरभीने कंपनीत नोकरी केली आणि नंतर ती सोडून आयएएस अधिकारी बनली. आयएएस अधिकारी सुरभी गौतम मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील अमदरा गावातील रहिवासी आहेत. शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेतून झाले. दहावी बोर्डाच्या परीक्षेत 93.4% गुण मिळाले. गणितात 100 पैकी 100 गुण होते. राज्याच्या मेरिट लिस्टमध्य़े तिचे नाव आले.
सुरभी गौतम आजारी असूनही बारावीत चांगले गुण मिळाले. तिला दर 15 दिवसांनी गावापासून 150 किमी दूर असलेल्या जबलपूरला उपचारासाठी जावे लागत होतं. बारावीनंतर भोपाळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी भाषेमुळे अनेक वेळा अ़डचणींचा सामना करावा लागला. लोकांनी थट्टा केली पण यामुळे ती खचली नाही. त्याऐवजी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व मिळवण्याचा निर्णय घेतला.
स्वतःशीच इंग्रजीत बोलू लागली. दररोज किमान 10 इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेतला. इंजिनीअरिंग कॉलेजमधून उत्तीर्ण होताच सुरभीला टीसीएसमध्ये नोकरी मिळाली. पण तिचे स्वप्न आयएएस होण्याचे होते. त्यामुळेच काही दिवसांनी नोकरी सोडली. यानंतर ती अनेक स्पर्धा परीक्षांना बसली. ज्यामध्ये ISRO, BARC, MPPSC, SAIL, FCI, SSC आणि दिल्ली पोलीस इत्यादींचा समावेश आहे.
सुरभीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसह यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. शेवटी, 2013 मध्ये, त्याने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ऑल इंडिया 50 व्या क्रमांकासह उत्तीर्ण झाली. अशा प्रकारे तिने आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.