वकिलांसमोर माफी मागत उठा-बशा काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याची झाली बदली; मुख्यमंत्री योगी होते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:43 IST2025-07-31T11:31:10+5:302025-07-31T11:43:25+5:30
वकिलांसमोर उठाबशा करणाऱ्या आयएएस रिंकू सिंह राहींची बदली करण्यात आली आहे.

वकिलांसमोर माफी मागत उठा-बशा काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याची झाली बदली; मुख्यमंत्री योगी होते नाराज
IAS Rinku Singh Rahi Transfer: उत्तर प्रदेशात आयएएस अधिकाऱ्याचा कान धरून उठा-बशा काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. कान धरून उठाबशा काढणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले आहेत. शाहजहांपूरमध्ये तैनात असलेल्या उपविभागीय दंडाधिकारी रिंकू सिंह राही यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. आंदोलन करणाऱ्या वकिलांची माफी मागताना एसडीएम रिंकु सिंह राही यांनी उठा-बशा काढल्या होत्या.
उपविभागीय दंडाधिकारी रिंकू सिंह राही यांनी कर्तव्याच्या पहिल्याच दिवशी केलेल्या या कृत्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली होती. लिपिकासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे संतप्त झालेल्या वकिलांना शांत करण्यासाठी रिंकू सिंह राही यांनी उठा-बशा काढून त्यांची माफी मागितली होती. १५ वर्षांपर्वी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रिंकू राहींवर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ज्यामुळे त्यांच्या जबड्याला दुखापत झाली होती आणि त्यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली होती. त्यानंतर नुकतीच त्यांची शाहजहानपूर येथे एसडीएम म्हणून बदली झाली होती.
मात्र आता रिंकू सिंह राहींवर सरकारने कारवाई केली आहे. आयएएस अधिकारी रिंकू सिंह राही यांची लखनऊ येथील महसूल मंडळात बदली करण्यात आली आहे. रिंकू सिंह राही यांनी कामाच्या पहिल्याच दिवशी शाहजहांपूरमध्ये त्यांनी एका वकिलाला उठाबशा करायला लावल्या होत्या. त्यानंतर स्थानिक वकिलांनी तीव्र निषेध केला. प्रकरण वाढल्यानंतर, रिंकू सिंह राही यांनी स्वतः सार्वजनिक ठिकाणी उठाबशा करून माफी मागितली, ज्यामुळे प्रकरण शांत झाले. त्यानंतर राज्य सरकारने त्यांची बदली केली. त्यांना लखनऊ येथील महसूल परिषदेत नियुक्त केले आहे. ही बदली वादाशी संबंधित आहे की नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, आयएएस रिंकू सिंह राही यांनी २००९ मध्ये ८३ कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला होता. हा भ्रष्टाचार समोर आणल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्याव सहा गोळ्या झाडल्या होत्या.