'जग विसरत चाललंय की...'; हवाई दल प्रमुखांनी सांगितले ऑपरेशन सिंदूर लवकर थांबवण्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:02 IST2025-09-19T20:01:43+5:302025-09-19T20:02:03+5:30
हवाई दल प्रमुख मार्शल एपी सिंग यांनी पाकिस्तानविरोधात राबवलेले ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचे कारण सांगितले.

'जग विसरत चाललंय की...'; हवाई दल प्रमुखांनी सांगितले ऑपरेशन सिंदूर लवकर थांबवण्याचे कारण
IAF Chief Air Marshal AP Singh: भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरल्या गेलेऱ्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीला गेम चेंजर म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की आजच्या युद्धांमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे, पण केवळ ड्रोनने युद्धे जिंकता येत नाहीत. लांब पल्ल्याच्या आणि प्राणघातक शस्त्रांव्यतिरिक्त, आपल्याकडे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास सक्षम विमाने देखील असली पाहिजेत असेही एपी सिंग म्हणाले.
तसेच पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचे उद्दिष्ट भारताने साध्य केल्यामुळे ऑपरेशन सिंदूर ४ दिवसांनीच थांबवण्यात आले, असे हवाई दल प्रमुख मार्शल एपी सिंग यांनी शुक्रवारी सांगितले. 'कोणत्याही संघर्षाची मोठी किंमत मोजावी लागते आणि त्याचा पुढील संघर्षाच्या तयारीवर परिणाम होतो,' असेही हवाई दल प्रमुख म्हणाले.
"आज जी मुख्य युद्धे सुरू आहेत, रशिया असो, युक्रेन असो किंवा इस्रायल युद्ध असो. ती वर्षे उलटून गेली तरी चालू आहेत. कारण कोणीही संघर्ष थांबवण्याचा विचार करत नाहीये. आम्ही ऐकले की लोक म्हणत होते की नाही आपण अजून थोडे अधिक लढायला हवे होते. आपण युद्ध खूप लवकर थांबवले. हो, पाकिस्तान युद्धात मागे पडलं काही शंका नाही, पण आमचे उद्दिष्ट काय होते? आमचे उद्दिष्ट दहशतवाद्यांच्या अड्डे उद्धवस्त करण्याचे होते. आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा होता आणि आम्ही ते केले होते," मार्शल एपी सिंग म्हणाले.
"जर आपली उद्दिष्टे साध्य झाली असतील, तर आपण हा संघर्ष का थांबवू नये? आपण संघर्ष का चालू ठेवायचा? कारण कोणत्याही संघर्षाची किंमत खूप जास्त असते. त्याचा परिणाम पुढील संघर्षाच्या तयारीवर होतो. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होते. त्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होतो. म्हणून, मला वाटते की जग हेच विसरत आहे. जेव्हा त्यांनी युद्ध सुरू केले तेव्हा त्यांचे ध्येय काय होते हे त्यांना माहित नाहीये," असेही मार्शल एपी सिंग यांनी म्हटलं.
"आता त्यांची ध्येये बदलत आहेत. याच्यामध्ये अहंकार अडथळा ठरतोय आणि इथेच जगाने भारताकडून संघर्ष कसा सुरू करायचा आणि तो शक्य तितक्या लवकर कसा संपवायचा याचा धडा घेतला पाहिजे असे मला वाटते, असं एपी सिंग यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाचे मुरीदके मुख्यालय यांचा समावेश होता. भारतविरोधी दहशतवादाला आश्रय देण्याचा आरोप असलेले हे सर्व दहशतवादी अड्डे भारतीय सशस्त्र दलांनी उद्ध्वस्त केली.
दहशतवाद्यांचे प्रमुख ज्या ठिकाणी राहत होते आणि हल्ला करण्याची योजना आखत होते त्या कार्यालयांवर भारताने हल्ले होते. भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंमध्ये दहशतवादी तळावार झालेला विनाश दिसून येत होता. या हल्ल्यांमध्ये आयसी-८१४ अपहरणकर्ता युसूफ अझहर, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख अबू जुंदाल आणि २०१६ च्या नागरोटा हल्ल्याच्या योजनाकाराचा मुलगा यासह सुमारे डझनभर प्रमुख दहशतवादी ठार झाले.