'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:05 IST2025-11-21T16:04:40+5:302025-11-21T16:05:49+5:30
संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, शिक्षक संघटनांनी सीरच्या ऑनलाईन प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
गांधीनगर : मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कामाच्या अत्यधिक दबावामुळे गुजरातमध्ये आणखी एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गिर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनार तालुक्यात, छारा गावातील बूथ लेव्हल ऑफिसर आणि शिक्षक अरविंद वाढेर यांनी आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, शिक्षक संघटनांनी सीरच्या ऑनलाईन प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली असहाय्यता
४० वर्षीय अरविंद वाढेर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या भावुक सुसाईड नोटमध्ये पत्नीला उद्देशून लिहिले, "माझ्याकडून हे सीरचे काम आता होणार नाही. मला गेली अनेक दिवस थकवा आणि त्रास जाणवत आहे. तुम्ही स्वतःची आणि मुलाची काळजी घ्या. मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करतो, पण मी आता खूप हतबल झालो आहे. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही."
वाढेर यांनी आपल्या पत्नीला बॅगमध्ये ठेवलेले सीरचे सर्व कागदपत्रे शाळेत जमा करण्यास सांगितले आहे.
देशभरातील ८ बीएलओंचा मृत्यू
अरविंद वाढेर यांच्या मृत्यूमुळे मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत गुंतलेल्या BLOs आणि शिक्षकांवरील प्रचंड कार्यभाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाढेर यांच्यासह, देशभरातील विविध राज्यांमध्ये राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू अति कामाचा ताण आणि तणावामुळे आतापर्यंत आठ बीएलओंचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये आत्महत्या तसेच हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे.
या घटनेनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, गुजरात प्रांताने, शिक्षकांनी SIR अंतर्गत सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असून, कामाच्या ताणाविरोधात आंदोलनाची पुढील रणनीती आखली जात आहे.