'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:31 IST2025-07-22T13:28:30+5:302025-07-22T13:31:47+5:30
Jagdeep Dhankhar J P Nadda: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर जे.पी. नड्डांचे राज्यसभेतील विधान चर्चेत आले आहे. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीबद्दलही चर्चा होत आहे. याबद्दल नड्डा यांनी भूमिका मांडली.

'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच उपराष्ट्रपती पदाचा धनखड यांनी राजीनामा देण्यापूर्वी घडलेल्या दोन घटनांची जोरदार चर्चा सुरू आहे. एक घटना राज्यसभेत घडली, जेव्हा आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, मी जे बोलेल तेच रेकॉर्डवर जाईल, हे तुम्हाला माहिती आहे. तर दुसरी म्हणजे जगदीप धनखड यांनी सायंकाळी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला जे.पी. नड्डा उपस्थित राहिले नाही. या दोन्ही घटनांबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी खुलासा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगदीप धनखड यांनी सोमवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर एका बैठकीची चर्चा सुरू झाली. धनखड यांनी ४.३० वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विरोधी पक्षाचे सदस्य होते. पण, जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू हे दोघेही त्या बैठकीला अनुपस्थित होते.
जे.पी. नड्डा राज्यसभेत काय बोलले होते?
राज्यसभेत सोमवारी जे.पी. नड्डा बोलत होते. त्यावेळी विरोधकांचा गोंधळ सुरू होता. त्याच वेळी जे.पी. नड्डा म्हणाले की, "काहीही रेकॉर्डवर जाणार नाही. जे मी बोलेन तेच रेकॉर्डवर जाईन, हे तुम्हाला माहिती आहे."
जे.पी. नड्डांच्या या विधानाचे राजीनाम्याच्या अनुषंगाने वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. या विधानाबद्दल नड्डांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी हेच म्हणालो की, जे मी सांगेन तेच रेकॉर्डवर जाईल. हे राज्यसभा सभापतींसाठी (उपराष्ट्रपती) नव्हते, तर अडथळा आणणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांसाठी होतं."
JP Nadda ने आज ही धनकड़ जी की बेइज्जती की थी, अगला ठहरा जाट, दे दिया इस्तीफा ?
— Sandeep Singh (@ActivistSandeep) July 21, 2025
pic.twitter.com/mSg5MF2cIB
राज्यसभा सभापती अर्थात उपराष्ट्रपतींनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला हजर न राहण्याबद्दल जे.पी. नड्डा म्हणाले, "मी आणि किरेन रिजिजू सायंकाळी ४.३० वाजताच्या बैठकीला जाऊ शकलो नाही कारण आम्ही दुसऱ्या संसदीय कामामध्ये होतो."