"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:50 IST2025-12-15T10:48:49+5:302025-12-15T10:50:47+5:30
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व आणि संसदीय समितीने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो १०० टक्के सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील असं नितीन नबीन यांनी म्हटलं आहे.

"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
पटना - बिहार सरकारमधील रस्ते बांधकाम, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा होईपर्यंत त्यांना याची कल्पनाही नव्हती. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी आपली निवड होईल याचा स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता. इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यावर सहसा विश्वास बसला नाही अशी प्रतिक्रिया नितीन नबीन यांनी दिली आहे.
नितीन नबीन यांनी म्हटलं की, हे फक्त भाजपात शक्य आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते. हे पत्रक जारी होण्याच्या एक दीड तास आधी ते कार्यकर्ता सन्मान सोहळ्यात होते. त्यात कुणालाही याची भनक नव्हती की सोहळ्यात कुणी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनणार आहे. कार्यकर्ता जमिनीवर काम करत असेल तर पक्षही त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो हे या निर्णयातून दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने पुढे जात आहे. त्यात संघटना आणि कार्यकर्ता यांना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व आणि संसदीय समितीने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो १०० टक्के सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील. बूथपासून राष्ट्रीय स्तरावर संघटना मजबूत करणे आणि येत्या निवडणुकीत विजय निश्चित केला जाईल. वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आणि कार्यकर्त्यांच्या बळावर प्रत्येक राज्यात पक्षाला ताकदवान केले जाईल. भाजपाने नेहमी सबका साथ, सबका विश्वास या मंत्रावर काम केले आहे. ज्याचा उद्देश समाजातील सर्व वर्गातील लोकांचा विकास व्हायला हवा. ही पक्षाची मुख्य विचारधारा बनली आहे असंही नितीन नबीन यांनी म्हटलं.
कोण आहेत नितीन नबीन?
नितीन नबीन सध्या बिहार सरकारमधील रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ते पाटण्याच्या बांकीपूर मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. कायस्थ समाजातून येणारे नबीन हे भाजपाचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून विद्यार्थी राजकारणापासून संघटनेतील विविध पदांपर्यंत त्यांनी प्रदीर्घ प्रवास केला आहे. नितीन नबीन यांनी मेहनती कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली आहे. ते युवा आणि कष्टाळू नेते असून, त्यांच्याकडे मोठा संघटनात्मक अनुभव आहे.बिहारमध्ये आमदार तसेच मंत्री म्हणून अनेक कार्यकाळासाठी त्यांचा विक्रम आहे. त्यांची ऊर्जा आणि समर्पण पक्षाला अधिक बळकट करेल असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केले आहे.