'मी काँग्रेसला आठवण करून देऊ इच्छितो की, मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता आणि जामिनावर बाहेर आल्यानंतरही जोपर्यंत न्यायालयात निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणतेही संवैधानिक पद स्वीकारले नव्हते', असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकाँग्रेसवर भडकले. लोकसभेत झालेल्या गोंधळात काँग्रेस खासदाराने केलेल्या एका आरोपावर शाह यांनी मौन सोडले आणि अनैतिक परंपरा इंदिरा गांधींनीच सुरू केली आहे, असा हल्ला केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके मांडली. यावेळी प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. या घटना दुरुस्तीनंतर कोणत्याही गंभीर प्रकरणामध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री यांना राजीनामा द्यावा लागेल.
काँग्रेसने मला खोट्या प्रकरणात अडकवले आणि अटक केली -शाह
अटक झाल्यानंतरही तुम्ही राजीनामा दिला नव्हता असा आरोप काँग्रेस खासदाराने केला. त्या आरोपावर अमित शाह यांनी उत्तर दिले. शाह म्हणाले, "आज सभागृहात काँग्रेसच्या एका नेत्याने माझ्याबद्दल व्यक्तिगत टीका केली. काँग्रेसने मला खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली होती. तेव्हा मी राजीनामा दिला नव्हता."
"मी काँग्रेसला सांगू इच्छितो की, मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता आणि जामिनावर आल्यानंतरही जोपर्यंत न्यायालयात पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालो नाही, तोपर्यंत मी कोणतेही घटनात्मक स्वीकारले नाही. माझ्याविरोधातील खोटे प्रकरण न्यायालयाने हे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले होते", असे अमित शाह म्हणाले.
इंदिरा गांधींनी अनैतिक परंपरा सुरू केली
अमित शाह काँग्रेसवर निशाणा साधताना म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी नेहमीच नैतिक मूल्यांच्या बाजूने राहिली आहे. लालकृष्ण आडवाणी यांनीही फक्त आरोप झाला म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. उलट इंदिरा गांधींनी सुरू केलेली अनैतिक परंपरा काँग्रेस आजही पुढे घेऊन जात आहे", अशी टीका त्यांनी केली.
"ज्या लालू प्रसाद यादव यांना वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने अध्यादेश आणला होता, ज्याला राहुल गांधींनी विरोध केला होता; आज तेच राहुल गांधी पाटण्यात गांधी मैदाना लालूजींची गळाभेट घेत आहेत. विरोधकांचे दुटप्पी चरित्र जनतेला कळून चुकले आहे", असा हल्ला अमित शाह यांनी राहुल गांधींवर केला.
विरोधक पूर्णपणे उघडे पडले -अमित शाह
अमित शाह म्हणाले, "आधीच हे ठरलेले होते की, हे विधेयक संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले जाणार. तिथे यावर चर्चा होणार, तरीही सर्व लाज सोडून भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडी एकत्रित येऊन वाईट पद्धतीने याचा विरोध करत आहे. आज विरोधक पूर्णपणे जनतेसमोर उघडे पडले आहेत."