फार दिवस जिवंत राहीन असं वाटत नाही, ईडीच्या कोठडीत असलेल्या बंगालच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 17:39 IST2023-11-12T17:38:27+5:302023-11-12T17:39:16+5:30
Jyotipriya Malik: पश्चिम बंगालमधील रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी आज एक सनसनाटी दावा केला आहे. माझी प्रकृती बरी नाही आहे. मी फार काळ जिवंत राहीन, असं वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

फार दिवस जिवंत राहीन असं वाटत नाही, ईडीच्या कोठडीत असलेल्या बंगालच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान
पश्चिम बंगालमधील रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी आज एक सनसनाटी दावा केला आहे. माझी प्रकृती बरी नाही आहे. मी फार काळ जिवंत राहीन, असं वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोलकाता येथे डिफेन्सच्या कमांड रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणीसाठी आणण्यात आल्यावर मलिक यांना वरील विधान केलं.
पश्चिम बंगालचे विद्यमान वनमंत्री आणि माजी अन्न आणि पुरवठा मंत्री मलिक हे तपास अधिकाऱ्यांसह ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले तेव्हा खूप थकलेले दिसले. दरम्यान, मलिक यांनी रेशन वितरणासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. गेल्या दोन दिवसांत दोन वेळा मलिक यांनी त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. १० नोव्हेंबर रोजी त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी कमांड रुग्णालयात आणले असताना मलिक यांनी आपली प्रकृती बिघडत असून काही अवयवांना अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो, असा दावा केला होता.
दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिक यांच्या निवास्थानी धाडी टाकून शोधमोहीम हाती घेतल्यावर मलिक यांच्या प्रकृतीवरून ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधा. एफआयआर दाखल करण्याचा इशारा दिला होता. मलिक यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे विनाकारण त्रास दिल्याने त्यांना काही झालं तर आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला होता.