'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:11 IST2025-08-09T19:07:24+5:302025-08-09T19:11:29+5:30
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवले असून, निवडणूक आयोगाच यात सामील असल्याचा आरोप केला आहे. आयोगाकडून हे आरोप फेटाळले जात असताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावत यांनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाला सुनावलं.

'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
Voter List Allegation News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरच मत चोरीचा आरोप केला आहे. बोगस मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे दाखवत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. केंद्रीय निवडणूक आयोग राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचे सांगत शपथपत्र द्या, असेही म्हणत आहे. याच मुद्द्यावरून माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी राहुल गांधींची बाजू घेत निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्र आणि दिल्लीतील विधानसभा निवडणूक झाल्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. आता त्यांनी मतदार यांद्यामधील बोगस मतदारांचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले. त्यानंतर आयोगाने राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचे सांगितले. आयोगाने त्यांना आरोप खरे आहेत, तर शपथपत्र द्या, असे आव्हानही दिले आहे.
रावत राहुल गांधींच्या आरोपावर काय बोलले?
माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी द टेलिग्राफशी बोलताना यावर भाष्य केले. ते म्हणाले, "मी जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त होतो, तेव्हा आमचे धोरण होते की, जर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आरोप केले, तर आम्ही त्यांची चौकशी करायचो आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायचो. जेणेकरून निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर विश्वास टिकून राहावा. माझ्या कार्यकाळात आम्ही कधीही त्यांना (राजकीय पक्ष) आधी तक्रार करा, असे सांगितले नाही", असे म्हणत रावत यांनी निवडणूक आयोगालाच अप्रत्यक्षपणे सुनावले.
७ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील काही मतदारसंघातील बोगस मतदारांची प्रकरणे समोर मांडली. कर्नाटकात एकाच घराच्या पत्त्यावर कसे ८० मतदार आहेत. असंख्य मतदारांचे फोटोच नाहीत. वडिलांची नावे नाहीत. मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे, याबद्दलचे मुद्दे त्यांनी मांडले.
देशात मतांची चोरी सुरू आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगच त्यात सहभागी आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापले असून, विरोधी पक्षाचे खासदार आणि नेते आता दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही काढणार आहेत.