उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक व्यक्ती अस्तित्वातच नसलेल्या देशाचा बनावट दूतावास चालवत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हर्षवर्धन जैन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आता उत्तर प्रदेश एसटीएफ या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच हे प्रकरण केवळ एका बनावट दूतावासापुरतं मर्यादित नसून परदेशात पसरलेलं हवाला नेटवर्क आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत.
एसटीएफने केलेल्या तपासामध्ये हर्षवर्धन जैन याने लंडन, दुबई, मॉरिशस आणि आफ्रिकेतील देशांमध्ये अनेक बनावट कंपन्या नोंदवून ठेवल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांमध्ये स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, ईस्ट इंडिया कंपनी यूके लिमिटेड, आयलँड जनरल को. एलएलसी (दुबई), इंदिरा ओव्हरसीज लिमिटेड (मॉरिशस), कॅमरून इस्पात एसएआरएल (आफ्रिका) यांचा समावेश आहे.
दरम्यान, आरोपी हर्षवर्धन जैन याची कसून चौकशी केली असता त्याने काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आपण हे सारं काही चंद्रास्वामीचा निकटवर्तीय असलेल्या एहसान अली सय्यद याच्या सांगण्यावरून केलं होतं, असे त्याने सांगितले. एहसान अली हा हैदराबादमधील रहिवासी आहे. तसेच त्याने तुर्कीचं नागरिकत्वही घेतलेलं आहे. लंडनमध्ये वास्तव्यास असताना एहसान याने हर्षवर्धनच्या मदतीने अनेक बनावट शेल कंपन्या सुरू केल्या होत्या. त्यांचा वापर हवाला आणि फ्रॉडसाठी केला जात होता.
हर्षवर्धन जैनकडून मिळालेल्या माहितीमधून त्याच्या नावावर भारतात आणि परदेशात अनेक बँक खाती असल्याचं समोर आलं आहे. त्यांची पडताळणी आता सुरू आहे. तसेच त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.