"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:34 IST2025-08-07T11:14:44+5:302025-08-07T11:34:56+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली.

I am ready to pay any price PM Modi First Statement On Donald Trump Tariff | "मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर

"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर

PM Modi On Donald Trump Tariff: भारतीय वस्तूंवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के आयात कर लादून भारताला मोठा इशारा दिला आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर अमेरिका दुय्यम निर्बंध लादण्यास मागेपुढे पाहणार नाही असाही इशारा ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी दिला. यावरुनच  भारतावर आर्थिक दबाव आणण्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण तयारी केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असं पंतप्रधान मोदींनी ठणकावलं आहे.

अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वॉर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या बाजूने एक मोठे विधान केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि ते त्यासाठी तयार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवी दिल्ली येथे एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. "सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही आणि मला माहित आहे की मला वैयक्तिकरित्या यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. पण मी त्यासाठी तयार आहे. आज भारत माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी तयार आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री त्यांनी भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनविरुद्ध रशियाला भारत निधी देत असल्याचा आरोप केला होता. भारताने या मुद्द्यावर कोणतेही सार्वजनिक विधान करण्याचे टाळले. भारताने चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेसोबत व्यापार करारावर गंभीर चर्चा झाली, पण डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेसाठी दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्र खुले करण्याच्या मागणीमुळे ही चर्चा तुटली. 'आम्ही कोणत्याही किंमतीत हे क्षेत्र उघडू शकत नाही. भारताची जवळजवळ ६० टक्के लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून आहे. जर हे क्षेत्र अमेरिकेसाठी खुले केले तर या क्षेत्रातील शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांवर गंभीर परिणाम होईल,' असं भारताकडून सांगण्यात आलं.

Web Title: I am ready to pay any price PM Modi First Statement On Donald Trump Tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.