मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:30 IST2024-12-05T08:29:25+5:302024-12-05T08:30:11+5:30
सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले

मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी
गाझियाबाद : संभल हिंसाचारातील पीडितांना भेटू न देणे व तिथे जाण्याची परवानगी नाकारून सरकारने लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी राहुल, प्रियांका व काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते संभलला निघाले होते. मात्र, दिल्ली-गाझीपूर सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. सीमेवर रोखल्यामुळे संभलला भेट न देताच गांधींना दिल्लीला परतावे लागले.
आम्ही हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी संभलला जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, पोलिस आमचे ऐकायला तयार नाहीत. मी नजरकैदेत आहे. ही गुंडागर्दी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींना रोखल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीने सरकारवर टीका केली.
प्रियांका गांधींकडून नाराजी व्यक्त
nदिल्ली-गाझीपूर सीमेवर राहुल यांना पोलिसांनी रोखल्यामुळे काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी नाराजी व्यक्त केली. संभलमध्ये जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे.
nराहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून, पीडितांना भेटण्याचा त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे संभलला जाण्यापासून त्यांना रोखले जाऊ शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.
संभलमध्ये नेमके काय घडले ते पाहणे अधिकार
पोलिसांसोबत एकट्याने जाण्याची तयारीही मी दाखवली. मात्र त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. हे कृत्य लोकशाहीविरोधी असल्याचे स्पष्ट करत राहुल गांधींनी हातातील संविधानाची प्रत दाखवली.
संभलमध्ये नेमके काय घडले ते आम्हाला पाहायचे आहे. पीडित लोकांना भेटणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे.
मला त्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. हा संविधानाला संपविणारा भारत आहे. मात्र आम्ही लढू, असे राहुल म्हणाले.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर चक्का जाम
nराहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरील बॅरिकेड्स तोडले. त्यामुळे या द्रुतगती महामार्गावर जवळपास चार तास वाहतूक कोंडी झाली.
nमात्र, पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुन्हा बॅरिकेड्स उभारत वाहनांची तपासणी सुरू केली. त्यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशी प्रशासनावर वैतागले होते.