पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 06:49 IST2024-09-30T06:49:42+5:302024-09-30T06:49:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मल्लिकार्जून खरगे यांना फाेन केला आणि त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
जसराेट/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जसरोटा येथे जाहीर सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. तातडीने उपचारांनंतर प्रकृती सुधारताच त्यांनी हाच धागा पकडून पुन्हा भाषण दिले. खरगे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी मी मरणार नाही.’
ते म्हणाले, ‘मी ८३ वर्षांचा आहे. इतक्या लवकर मी मरणार नाही. पंतप्रधान मोदी सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी जिवंत राहीन.’ बांगलादेशला स्वातंत्र्य कुणी दिले... इंदिरा गांधींनी. जय जवान, जय किसान घोषणा आम्हीच दिली होती. पाकिस्तानलाही आम्हीच हरवले, असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान माेदींकडून तब्येतीची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मल्लिकार्जून खरगे यांना फाेन केला आणि त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच त्यांच्या चांगल्या आराेग्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.