पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना भारताने उद्ध्वस्त केलं. दरम्यान, भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा सहभाग असणार आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचा समावेश आहे. पण, त्यांनी केंद्राला परदेशात जाण्यासाठी उपलब्ध नसल्याचे कळवले आहे.
या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही, असं युसूफ पठाण यांनी भारत सरकारला कळवले आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचा समावेश केला जाणार नाही. भारत सरकारने थेट खासदार युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता.
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांच्या नावाचा समावेश करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भारत सरकारने थेट युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता आणि आता पठाण यांनी भारत सरकारला कळवले आहे.
टीएमसीने परराष्ट्र धोरणाबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळातून युसूफ पठाण यांनी आपले नाव मागे घेतल्यानंतर, टीएमसीने म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे.
दौरा कधीपासून होणार सुरू?
परराष्ट्र मंत्रालय या योजनेत समन्वयकाची भूमिका बजावत असून शिष्टमंडळांचा हा दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांशी चर्चा करून शिष्टमंडळात सहभागी करण्यासाठी खासदारांची नावे परराष्ट्र मंत्रालय निश्चित करीत आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही खासदारांशी संपर्क साधत आहेत.