हैदराबादमधील मियापूर पोलिस स्टेशन परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली. ही घटना मकठा मेहबूबपेट कॉलनीमध्ये घडली. मृतांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय आहे. शवविच्छेदनाचा अहवालानंतरच मृत्युमागचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले.
उपारी लक्ष्मैया (वय, ६०) त्यांची उपारी वेंकटम्मा (वय, ५५) मुलगी कविता (वय, २४) जावई अनिल (वय, ३२) आणि नातू अप्पू (वय, २) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी लक्ष्मैया यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी मियापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोन वर्षाच्या चिमुकलीसह पाच जण मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, मृतांनी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्युमागचे कारण स्पष्ट होईल. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मैया यांनी कर्ज घेतले होते आणि तो आर्थिक संकटात होता. हे कुटुंब २०१९ मध्ये हैदराबादला आले. गेल्या दोन वर्षांपासून मकठा परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. याप्रकरणी मियापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.