जलवाहतुकीसाठी लवकरच ‘हायब्रिड एरोबोट’? हवेत उडण्याचीही क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:51 IST2018-11-02T04:03:21+5:302018-11-02T06:51:40+5:30

भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ लवकरच जलमार्गांमध्ये चालताना दिसणार आहेत.

'Hybrid aerobot' for shipping? | जलवाहतुकीसाठी लवकरच ‘हायब्रिड एरोबोट’? हवेत उडण्याचीही क्षमता

जलवाहतुकीसाठी लवकरच ‘हायब्रिड एरोबोट’? हवेत उडण्याचीही क्षमता

नागपूर : भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ लवकरच जलमार्गांमध्ये चालताना दिसणार आहेत. पाणी, दलदल, बर्फावरदेखील चालू शकणाऱ्या या बोटींसंदर्भातील प्रस्तावाचे रशियन कंपनीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले.

देशांतर्गत जलवाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता केंद्रातर्फे बहुआयामी पर्यायांचा शोध सुरू होता. याअंतर्गतच रशिया येथील ‘स्कोल्कोव्हो फाऊंडेशन’अंतर्गत तेथील काही कंपन्यांनी अल्युमिनियमद्वारे ‘हायब्रिड एरोबोट’ तयार केल्या आहेत. देशांतर्गत जलवाहतुकीस सोयीस्कर या ‘एरोबोट’ अवघे १० सेमी पाणी असलेल्या चिखलयुक्त प्रदेशातून चालू शकतात. विशेष म्हणजे, या पेट्रोल, विद्युत यांच्यासोबतच ‘मिथॅनोल’वरदेखील वापरल्या जाऊ शकता. या बोटींची प्रवासी क्षमता ही ११ ते ६० प्रवाशांपर्यंत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हवेतदेखील उडू शकते बोट
मोठ्या ‘हायब्रिड एरोबोट’मध्ये ‘एव्हिएशन’ तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे ही बोट पाण्याच्या तळापासून तीन मीटर उंचीवर चक्क उडू शकते. पण त्यामुळे नागरी उड्डयन विभागाच्या नियमांचादेखील भंग होत नाही. या बोटींचे ‘स्पेअर पार्ट्स’ सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे आग्रा, अलाहाबाद येथे होणारा कुंभमेळा व इतर गर्दीच्या ठिकाणी यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Hybrid aerobot' for shipping?