विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. इथून संसाराला नवं वळण मिळतं. अनेकजण विवाहानंतच्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असतात. पण काही जणांच्या वाट्याला मात्र विवाहानंतर खडतर अनुभव येतात. त्यामधून त्यांना जगणं नकोसं होतं. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला असाच अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी शालिनी आणि प्रणव यांचा विवाह मुझफ्फरनगर येथे अगदी धुमधडाक्यात झाला होता. त्यानंतर सुखी संसाराची आणि हनिमुनच्या रोमँटिक अनुभवाची स्वप्नं रंगवत शालिनी ही पती प्रणवसोबत हनिमूनसाठी रवाना झाली. तिथे पोहोचताच मात्र सगळं चित्रच बदलून गेलं. पती प्रणवनं शालिनीसोबत बोलणं बंद केलं. एवढंच नाही तर त्याने ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच हनिमूनहून परतल्यानंतर शालिनी हिला माहेरी पाठवले. तसेच तिला परत आणलंच नाही. त्यानंतर शालिनी जेव्हा स्वत:हून माघारी आली. तेव्हा सासरच्या मंडळींनी तिच्यासाठी घराचे दरवाजेदेखील उघडले नाहीत. त्यामुळे शालिनी हिने सासरच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. एवढंच नाही तर शालिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी तिथेच जीवन संपवण्याची धमकीही दिली आहे.
याबाबत शालिनी हिने सांगितले की, माझं लग्न प्रणव सिंगल याच्यासोबत झालं होतं. आम्ही हनिमूनसाठी इंडोनेशियातील बाली येथे गेलो होतो. तिथे प्रणवचं वागणं अचानक बदललं. तो म्हणाला की, मला खूप खर्च झाला आहे. लग्न आणि घर बांधण्यामध्ये खूप पैसे खर्च झाले आहेत. आता तुला आम्हा लोकांसोबत राहायचं असेल, तर माहेरून ५० लाख रुपये घेऊन ये. तेव्हा मला वाटलेलं की वेळेबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. ५० लाख रुपये ही माझ्या वडिलांकडे मागून सहज मिळतील अशी परिस्थिती नव्हती. ते एवढ्या तातडीने एवढे पैसे देऊ शकले नसते. दरम्यान, काही दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी माझ्यासोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं.
अखेर प्रथा असल्याचं सांगत होळीसाठी मला माहेरी पाठवलं. मात्र नंतर मला नेण्यासाठी कुणीच आलं नाही. शेवटी मी स्वत: काका आणि इतर मंडळींना घेऊन सासरी आले. मात्र मला घरात प्रवेश करू दिला नाही. मला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर पोलिसांनाही बोलावलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आतापर्यंत आमच्याकडे कुणाकडूनही कुठलीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतरच आम्ही यावर काही तरी बोलू.