बलात्कार पिडीत पत्नीला पतीने फोनवरच दिला घटस्फोट
By Admin | Updated: April 13, 2015 14:28 IST2015-04-13T14:28:04+5:302015-04-13T14:28:04+5:30
बलात्कार पिडीत महिलेला तिच्या पतीने फोनवरच घटस्फोट देत घरातून बाहेर काढल्याची संतापजनक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.

बलात्कार पिडीत पत्नीला पतीने फोनवरच दिला घटस्फोट
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. १३ - बलात्कार पिडीत महिलेला तिच्या पतीने फोनवरच घटस्फोट देत घरातून बाहेर काढल्याची संतापजनक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे महिलेच्या सासरच्यांनी तिच्या मुलालाही स्वतःकडे ठेवून घेतले असून आता ही महिला न्यायासाठी पोलिसांच्या दारी पोहोचली आहे.
उत्तरप्रदेमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यात शाहपूर येथे एक विवाहीत महिला व तिच्या अडीच वर्षाच्या मुलासोबत राहते. शुक्रवारी रात्री गावातील चार नराधमांनी घरात घुसून त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या धक्क्यातून सावरत पिडीत महिला पोलिसांकडे गेली. नराधमांविरोधात तक्रारही दाखल केली. या घटनेची माहिती पिडीत महिलेने तिच्या सासरच्यांनाही दिली होती. पण त्यांनी महिलेला आधार देण्याऐवजी तिलाच घरातून बेदखल केल्याचे स्थानिक हिंदी वृत्तपत्राने म्हटले आहे.
पिडीत महिलेचा पती सौदी अरेबियात कामाला असून तिने फोनवरुन त्याच्याशी संपर्क साधला. पतीनेही फोनवरच तलाख असे सांगत तिला घटस्फोट दिला आहे. सासरच्या मंडळींनी तिच्या मुलाला स्वतःकडे ठेवले असून तिला घरातही येऊ दिले जात नाही. अद्याप महिलेवर बलात्कार करणारे नराधमही बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे सासरच्या मंडळींनी नाकारल्याने महिलेला आणखी एक मानसिक धक्का सोसावा लागतोय.