एका तरुणीने तिच्या पतीवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे तामिळनाडूचं राजकारण तापलं आहे. डीएमकेच्या युवा संघटनेचा उपसचिव अशी ओळख करून देणारा माझा पती मुलींना नेत्यांकडे झोपण्यासाठी पाठवायचा, असा आरोप तामिळनाडूतील या २० वर्षीय तरुणीने तिच्या ४० वर्षीय पतीवर केला आहे. माझं काम २० वर्षीय तरुणी नेत्यांना पुरवण्याचं आहे, असे माझा पती सांगतो. असा दावा या महिलेने केला आहे. तसेच या महिलेने या संदर्भात कारवाई करण्याची मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे केली आहे. मात्र महिलेने केलेल्या आरोपांबाबतच्या प्राथमिक तपासामधून कुठलेही सबळ पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आपल्या तक्रारीमध्ये ही महिला म्हणाली की, माझा पती मला कुत्र्यांप्रमाणे चावतो. तसेच माझ्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देतो. या महिलेने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, माझा पती मला कॉलेजमध्ये जातेवेळी मारहाण करायचा. त्याने माझा फोनसुद्धा त्याने फोडून टाकला. तसेच मी कुणाला काही सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. पोलीससुद्धा माझं म्हणणं ऐकून घेणार नाहीत, अशी धमकी तो मला द्यायचा.
पीडित महिलेने या प्रकरणी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना आवाहन करताना आरोपीवर कारवाई झाली नाही तर मी जीवन संपवेन, असा इशारा दिला आहे. मी घराबाहेर पडू शकत नाही. एवढंच नाही तर मी परीक्षाही देऊ शकले नाही, असा आरोप केला आहे. दरम्यान, या महिलेने केलेल्या आरोपांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेने सत्ताधारी डीएमकेला घेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर या प्रकरणात कुणी दोषी आढळला तर कारवाई केली जाईल, असे डीएमकेने स्पष्ट केले आहे.