गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:09 IST2025-11-06T13:08:31+5:302025-11-06T13:09:33+5:30
ज्योतीची तब्येत बिघडत असल्याने डॉक्टरांनी तिला रात्री उशिरा रायबरेलीच्या एम्स हॉस्पिटलला नेण्यास सांगितले.

गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
अमेठी - पत्नीच्या मृत्यूनंतर १२ तासांनी पतीचाही मृत्यू झाल्याची घटना अमेठी येथे घडली आहे. ही महिला ८ महिन्याची गर्भवती होती. प्रसुती वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलला नेले. मंगळवारी रात्री हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच पतीलाही मोठा धक्का बसला आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. पत्नी सोडून गेल्याचा विरह सहन न झाल्यानं त्याने अन्न पाणी सोडले. त्यात तब्येत आणखी बिघडली. त्यानंतर त्यालाही हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आणि तिथे पतीचा मृत्यू झाला.
पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं बोलले जाते. गुरुवारी या दोघांवर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. या दोघांच्या लग्नाला अलीकडेच १ वर्ष पूर्ण झाले होते. २२ वर्षीय आकाश त्याच्या कुटुंबासह निखई परिसरात राहत होता. पाच भावंडांमध्ये आकाश चौथ्या नंबरवर होता. एक वर्षापूर्वी आकाशचे लग्न २० वर्षीय ज्योतीशी झाले होते. लग्नानंतर या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. ज्योती ८ महिन्याची गर्भवती होती. मंगळवारी संध्याकाळी ज्योतीला प्रचंड प्रसुती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले.
ज्योतीची तब्येत बिघडत असल्याने डॉक्टरांनी तिला रात्री उशिरा रायबरेलीच्या एम्स हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. मात्र तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पत्नीच्या मृत्यूची बातमी पतीला कळताच त्याला जबर धक्का बसला. तो सातत्याने पत्नी ज्योतीचा फोटो घेऊन धाय मोकलून रडत होता. त्यातच त्याने अन्न पाणी सोडले. दुपारी आकाशची तब्येत ढासळली, त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात आणले मात्र अडीचच्या सुमारास आकाशने जीव सोडला. आकाश परिसरातील एका दुकानात काम करत होता. मुलगा आणि सुनेच्या मृत्यूने घरातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, लग्न झाल्यापासून हे दोघेही कायम आनंदात होते. त्यांचे आयुष्य सुखात चालले होते. परंतु नियतीच्या मनात भलतेच काही होते. आज पत्नी आपल्याला सोडून गेल्याचे दु:ख पती सहन करू शकला नाही. त्यामुळे पत्नीच्या विरहात त्याचेही प्राण गेले. आज दोघांचीही गावात एकाच वेळी तिरडी निघणार असून या घटनेने शोककळा पसरली आहे.