हृदयद्रावक! पती-पत्नीची आत्महत्या, मृतदेहाजवळ सहा महिन्याच्या बाळानं फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 21:26 IST2017-11-16T21:26:32+5:302017-11-16T21:26:57+5:30
एका जोडप्यानं त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या जोडप्याच्या मृतदेहाजवळ त्यांचे सहा महिन्याचे बाळ अतिशय केविलवाणे होऊन रडत बसले होते

हृदयद्रावक! पती-पत्नीची आत्महत्या, मृतदेहाजवळ सहा महिन्याच्या बाळानं फोडला टाहो
नवी दिल्ली - नवी दिल्लीतील संगम विहार भागामध्ये एका जोडप्यानं त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या जोडप्याच्या मृतदेहाजवळ त्यांचे सहा महिन्याचे बाळ अतिशय केविलवाणे होऊन रडत बसले होते. हे हृदयद्रावक दृश्य बघून पोलीस देखील हेलावले आहेत. या जोडप्याने आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राम चंदेर (३२) आणि नीतू चंदेर (२७) असे त्या जोडप्याचे नाव असून ते संगम विहारच्या एल ब्लॉकमध्ये राहत होते. गुरुवारी पहाटेपासून चंदेर यांच्या घरातून त्यांच्या सहा महिन्याच्या बाळाचा रडण्याचा आवाज येत होत होता. बाळ सतत रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना काहीतरी विचित्र घडल्याचा संशय आला. त्याबाबात त्यांनी सहाच्या सुमारास जोडप्याच्या नातेवाईकांना कळविले व त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता समोरच नीतूचा मृतदेह दिसला तर तिच्या मृतदेहाजवळ बसून तिचे सहा महिन्याचे बाळ केविलवाणे रडत होते. त्यानंतर पोलिसांना बेडरूममध्ये रामचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
नीतू व रामने आत्महत्या केल्या की त्यांची हत्या झाली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. नीतूच्या गळ्यावर देखील फासावर लटकवल्यासारख्या खुणा आहेत त्यामुळे तिचा मृत्यूही गळफास घेतल्यानेच झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आले आहे. नीतू व रामचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे नेबी सराई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान नीतूच्या आईने आत्महत्या करण्यासारखे काहीही घडले नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. नीतू व राम यांना एक तीन वर्षाचा देखील मुलगा असून आदल्या दिवशीच ते त्याला नीतूच्या आईच्या घरी सोडून आले होते.