हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:02 IST2025-12-06T17:02:05+5:302025-12-06T17:02:38+5:30
Babri Masjid in Murshidabad News: पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशिदीसारख्या मशिदीची पपायाभरणी केली आहे. यावेळी त्यांचे समर्थक विटा घेऊन जाताना दिसले होते.

हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशिदीसारख्या मशिदीची पपायाभरणी केली आहे. यावेळी त्यांचे समर्थक विटा घेऊन जाताना दिसले होते. हुमायूं कबीर यांच्या या पावलानंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टाने मशिदीच्या बांधकामामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. मात्र हुमायूं कबीर यांच्या या निर्णयानंतर बंगालमधील राजकीय वर्तुळात मोठा वाद उफाळून आला आहे. तसेच प्रशासन संपूर्ण प्रकरणावर सतर्कतेने लक्ष ठेवून आहे.
हुमायूं कबीर यांच्या या निर्णयावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या याचा वापर राजकीय लाभासाठी करत आहेत असा आरोप केला. कबीर यांचे समर्थक मशिदीच्या बांधकामासाठी परिसरात फिरत आहेत. तसेच पोलिसांचा आपल्याला पाठिंबा मिळत आहे, असा दावा कबीर हे करत आहेत, असा आरोपही मालवीय यांनी केला.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणावरून भाजपावर आरोप केला आहे. हुमायूं कबीर हे भाजपा आणि आरएसएसच्या मदतीने जिल्ह्यात अशांतता माजवत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर हुमायूं कबीर हे भाजपाच्या एजंटसारखं काम करत आहेत. तसेच लोकांमध्ये प्रक्षोभक संदेश पसरवत आहेत, असा आरोपही तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.