दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:23 IST2025-11-13T12:19:45+5:302025-11-13T12:23:00+5:30
दिल्लीत कारमध्ये झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की अनेकजणांचे अवयव विखुरले गेले.

दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
Delhi Blast Site: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाला दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र तपास यंत्रणांना अजूनही स्फोटाच्या जागेपासून दूरवर पुरावे आणि मानवी अवयव मिळत आहेत. या स्फोटाच्या तपासात आज एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला. गुरुवारी सकाळी, स्फोटस्थळापासून सुमारे ३०० मीटर दूर असलेल्या एका दुकानाच्या छतावर मानवी हाताचा एक भाग सापडल्याने खळबळ उडाली. यावरुन स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येत आहे.
न्यू लाजपत राय मार्केटमध्ये सापडला हात
हा मानवी हात न्यू लाजपत राय मार्केटमधील एका दुकानाच्या छतावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला होता. न्यू लाजपत राय मार्केट हे लाल किल्ल्यासमोर चांदनी चौक परिसरात असलेले एक प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सचे मोठे केंद्र आहे. स्फोटानंतर दिल्ली पोलीस परिसराची तपासणी करत असताना, त्यांना हा हात' आढळून आला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे शरीरापासून वेगळा झालेला हा अवयव नेमका कोणत्या व्यक्तीचा आहे, हे ओळखण्याचे मोठे आव्हान आता दिल्ली पोलीस आणि फॉरेन्सिक टीमसमोर आहे. स्फोटात मारले गेलेले नागरिक की अन्य कोणाचा हा अवयव आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा आता पुराव्यांवर काम करत आहे.
मृतांचा आकडा १३ वर; 'बिलाल'चा मृत्यू
या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढून १३ वर पोहोचला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या बिलाल नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तो व्हेंटिलेटरवर होता. या १३ मृतांमध्ये १० लोकांची ओळख पटली आहे. यामध्ये ९ सामान्य नागरिक आहेत. तर एक मृतदेह स्फोट झालेली कार चालवणाऱ्या डॉ. उमर मोहम्मद नबीचा आहे. डॉ. उमर मोहम्मद याची ओळख त्याच्या आईच्या डीएनएवरुन झाला. मात्र, स्फोटानंतर मिळालेल्या मानवी अवयवांवरून अजूनही दोन उर्वरित मृत व्यक्तींची ओळख पटलेली नाही.
तपास यंत्रणांचे कार्य
पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टीम घटनास्थळावरून अधिक पुरावे गोळा करत आहेत. संपूर्ण दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत तपास यंत्रणांना प्रत्येक पावलावर नवीन माहिती मिळत आहे.