जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:55 IST2025-12-31T11:55:10+5:302025-12-31T11:55:50+5:30
नळावाटे आलेल्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण वस्तीत मृत्यूचे तांडव सुरू असून, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
माणसाची सर्वात मूलभूत गरज म्हणजे पाणी. पण हेच पाणी जर मृत्यूचे कारण बनले तर? मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमधील भागीरथपुरा भागात सध्या अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. नळावाटे आलेल्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण वस्तीत मृत्यूचे तांडव सुरू असून, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या या वस्तीत सध्या भीती आणि आक्रोश पाहायला मिळत असून, १०० हून अधिक जणांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
भागीरथपुरा वस्तीतील नागरिकांनी नळाचे पाणी प्यायल्यानंतर अचानक त्यांना उलट्या, तीव्र पोटदुखी आणि चक्कर येण्याचे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता ही संख्या वाढत गेली आणि वस्तीतील घराघरांतून रुग्ण बाहेर पडू लागले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये ड्रेनेज आणि सांडपाणी मिसळल्याने हे 'जलसंकट' ओढावले. या गंभीर घटनेनंतर महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून तातडीने ३ जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मृत्यूचा आकडा वाढल्याने खळबळ
आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाच्या दाव्यानुसार यातील ३ मृत्यू हे थेट दूषित पाण्यामुळे झाले असून, उर्वरित ५ जणांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. सध्या ६६ रुग्णांवर उपचार सुरू असून ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
महापौर म्हणतात, 'आमची नैतिक जबाबदारी'
इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ज्या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत होते, तो भाग आम्ही शोधला आहे. हे काम युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत," असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, महापौरांनी ६ महिन्यांपूर्वीच या भागातील जुन्या पाईपलाईन बदलण्याचे आणि तक्रारींची दखल घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही कामात दिरंगाई का झाली, याची चौकशी आता केली जाणार आहे.
#WATCH | इंदौर, मध्य प्रदेश: इंदौर के मेयर पुष्यमित्र भार्गव ने भागीरथपुरा में दूषित पानी मामले पर कहा, "बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि भागीरथपुरा पानी की टंकी से जो मुख्य लाइन जा रही थी उसमें किसी एक स्थान पर ड्रेनेज और सीवरेज का पानी मिल रहा था। वह प्वॉइंट मिल चुका है जिसे ठीक करने… pic.twitter.com/zJPmpUc2B6
— ANI_HindiNews (@AHindinews) December 30, 2025
राजकारण तापलं!
एकीकडे वस्तीत मृत्यूची भीती असताना दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली आहे. यावर महापौरांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, "विपक्षाने अशा संवेदनशील वेळी राजकारण करू नये, आमचे प्राधान्य नागरिकांचे प्राण वाचवण्याला आहे." भागीरथपुरात सध्या प्रत्येक नळाची तपासणी केली जात असून टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, गेलेले जीव परत येणार नसल्याने स्थानिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.