Sambhal Temple :उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर प्रशासनाकडून उघडण्यात आले आहे. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा हे प्राचीन मंदिर सापडले.
मंदिरात शिवलिंग आणि हनुमान यांची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली आहे. त्यानंतर प्रशासनाला उत्खननादरम्यान आणखी तीन मूर्ती सापडल्या आहेत. माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांची मूर्ती मिळाली. संभलच्या खग्गु सराय भागातील हे कार्तिक शंकर मंदिर आहे.
हे मंदिर सुमारे ३०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. हा भाग पूर्वी हिंदूबहुल होता. त्या काळाची आठवण करून देताना ८२ वर्षीय विष्णू शरण रस्तोगी यांनी सांगितले की, कार्तिक शंकर मंदिर हे येथील हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र होते. मात्र, १९७८ च्या दंगलीनंतर हिंदू कुटुंबाने येथे पूजा करणे बंद केले. आमच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले होते.
मंदिराजवळच एक पिंपळाचे झाड होते आणि तिथे एक विहीरही होती. लोक सकाळ- संध्याकाळ मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि विहिरीजवळ कीर्तन होत होते. १९७८ मध्ये येथे दंगल झाली. त्यानंतर येथून हिंदूंनी पलायन केले. आजूबाजूला मुस्लीम लोकांची संख्या जास्त होती, त्यामुळे घाबरून हिंदू लोक तिथून निघून गेले. या परिसरात ४० ते ४२ हिंदू कुटुंबे राहत होती, असे विष्णू शरण रस्तोगी यांनी सांगितले.
मंदिराभोवती ४ फूट प्रदक्षिणा मार्ग होताविष्णू शरण रस्तोगी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात पूजा आणि आरती करण्यासाठी कोणीही शिल्लक नव्हते. आम्ही आमचे घरही एका मुस्लीम कुटुंबाला विकले. मंदिराच्या शिखरावरून लोकांनी बाल्कनी काढली होती. मंदिराभोवती ४ फूट प्रदक्षिणा मार्ग होता, मात्र समोरचा भाग वगळता तिन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले होते.
मंदिर ३०० वर्ष जुनेमंदिराला लावण्यात आलेले कुलूप हे आमच्या कुटुंबाचे होते. मात्र, मंदिर कधीही उघडण्यात आले नाही किंवा कोणतीही पूजा करण्यात आली नाही. मी ४९ वर्षांपूर्वी मंदिरात पूजा करण्यासाठी पुजाऱ्याची व्यवस्था केली होती, पण पुजाऱ्याला मंदिरात जाताना भीती वाट होती. दोन-तीन दिवस पुजारी मंदिरात गेले, पण त्यानंतर त्यांनी तिथे जाण्यास नकार दिला. अतिक्रमणधारकांनी विहीर बंद करून त्यावर कार पार्क करण्यासाठी रॅम्प बनवला आहे. मंदिरासाठी जमीन आमच्या कुटुंबाने दिली आहे. ती जवळपास ३०० वर्षे जुनी असावी, असेही विष्णू शरण रस्तोगी यांनी सांगितले.