बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:41 IST2025-10-30T20:41:33+5:302025-10-30T20:41:59+5:30
सर्व्हेमुळे राजद-काँग्रेसवाले खूप घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी जाहीरनाम्यात अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या केवळ आणि केवळ खोट्या आहेत असं मोदींनी म्हटलं.

बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
मुजफ्फरपूर - बिहारच्या निवडणुकीत एनडीए घटक पक्षाचा मोठा विजय होणार आहे. या निवडणुकीत महाआघाडीला आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा मिळतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत केला आहे. मुजफ्फरपूरच्या जनसभेत त्यांनी लोकांना संबोधित करत निवडणुकीच्या निकालावर भविष्यवाणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज प्रत्येक सर्व्हेत एक गोष्ट उघडपणे समोर येत आहे, या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. सर्व सर्व्हेत हेच सांगितले जात आहे. सर्व सर्व्हेत या निवडणुकीत एनडीएचा प्रचंड मोठा विजय होणार असल्याचं बोललं जात आहे. राजद आणि काँग्रेसला आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा मिळणार आहेत. एक नवा इतिहास बिहारचे युवा, बिहारची महिला, बिहारचे शेतकरी आणि बिहारचे मच्छिमार बनवणार आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच सर्व्हेमुळे राजद-काँग्रेसवाले खूप घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी जाहीरनाम्यात अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या केवळ आणि केवळ खोट्या आहेत. हे लोक इतके फेकत आहेत की त्यांच्या समर्थकांनाही ते पचत नाही. बिहारचे युवक सोशल मीडियात कशारितीने त्यांची खिल्ली उडवत आहेत हे मी पाहतोय. बिहारच्या लोकांची बौद्धिक क्षमता कमी असल्याचं राजद-काँग्रेसला वाटत आहे असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
दरम्यान, तेलंगणा, कर्नाटकातील काँग्रेस नेते बिहारींना शिव्या देतात. बिहारींचा अपमान करणाऱ्यांना काँग्रेस व्यासपीठावर बोलवत आहे. यावेळी काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडली. ज्या लोकांनी बिहारींना अपमानित केले त्यांना निवडणूक प्रचाराला बोलावले. हे सर्व ठरवून केले आहे. त्यामुळे आरजेडीला निवडणुकीत नुकसान व्हावे असं काँग्रेसला वाटते. त्यामुळे जाणुनबुजून या लोकांना प्रचाराला बोलवले जात आहे असं सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राजदमध्ये वाढती दरी हे यामागचे कारण असल्याचा दावा केला आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेच्या संघर्षात इतके गुंतले आहेत की त्यांना बिहारच्या अस्मितेचा सन्मानही करता येत नाही असा टोला मोदींनी लगावला.
सुनिए, प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने बताया कि कैसे लालटेन वाले, पंजे वाले और उनके इंडी गठबंधन के साथी, बिहार और बिहारियों के अपमान में कोई कसर नहीं छोड़ते।#ModiNitishForBiharpic.twitter.com/dikXBCGADK
— BJP Bihar (@BJP4Bihar) October 30, 2025