मंदिरातील विहिरीने कसा घेतला ३६ जणांचा बळी? इंदूरमधील दुर्घटनेचं धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 19:57 IST2023-03-31T19:57:19+5:302023-03-31T19:57:44+5:30
Indore Temple Accident: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रामनवमी दिवशी झालेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागलं होतं. मंदिरात भक्तिमध्ये गुंग झालेल्या लोकांना ते जिथे उभे होते.

मंदिरातील विहिरीने कसा घेतला ३६ जणांचा बळी? इंदूरमधील दुर्घटनेचं धक्कादायक कारण आलं समोर
मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रामनवमी दिवशी झालेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागलं होतं. मंदिरात भक्तिमध्ये गुंग झालेल्या लोकांना ते जिथे उभे होते. त्यावेळी आपण जिथे आहोत त्याखाली साक्षात मृत्यू दबा धरून बसलाय, याची कल्पना त्या लोकांना नव्हती. मंदिरात झालेल्या या दुर्घटनेमुळे केवळ मध्य प्रदेशच नाही तर संपूर्ण देशाल धक्का बसला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३६ जणांचा बळी गेला आहे.
या दुर्घटनेबाबत स्थानिक रहिवासी शिवशंकर मौर्य यांनी सांगितले की, मंदिर सुमारे ५० वर्षे जुने आहे. तर ही विहीर सुमारे १०० वर्षे जुनी आहे. आधी ही विहीर उघडी होती. सुमारे २५ वर्षांपूर्वी तिच्यावर स्लॅब टाकण्यात आले. त्यानंतर ती विहीर मंदिराचाच एक भाग बनली. हा भाग बेकायदेशीर होता. रामनवमी दिवशी जेव्हा भाविक मोठ्या संख्येने तिथे जमले तेव्हा विहिरीवरील स्लॅब तुटला आणि लोक त्यामध्ये अडकले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रामनवमीनिमित्त येथे हवनाचा कार्यक्रम सुरू होता. हवन संपन्न होताच जेव्हा आरतीसाठी भाविक जमले, त्याचवेळी विहिरीवर टाकलेला स्लॅब तुटला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर इंदूर महानगरपालिकेच्या आयुक्त प्रतिभा पाल यांनी कारवाई करत स्थानिक बिल्डिंग इन्स्पेक्टर आणि बिल्डिंग ऑफिसर यांना निलंबित केलं आहे. तर राज्य सरकारनेही मॅजिस्ट्रेटकडून चौकशीचे आदेश दिले आहेत.
इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देऊस्कर यांनी सांगितले की, या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सचिवांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बेलेश्वर मंदिरात असलेल्या विहिरीप्रमाणे जेवढ्याही विहिरी आहेत, त्यांची चौकशी करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही.
इंदूरमधील स्नेहनगर परिसरात असलेल्या बेलेश्वर महादेव मंदिरात गुरुवारी रामनवमी दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मंदिरामध्ये पूजाविधी सुरू होती. हवन समाप्त झाल्यानंतर जेव्हा लोक पूर्णाहुतीसाठी आपल्या जागेवर उभे राहिले, तेव्हा ही दुर्घटना घडली. त्यांच्या पायाखालील लादी तुटली आणि हे सारे जण विहिरीत पडले. ही लादी जुन्या विहिरीवर काँक्रिट टाकून त्यावर बनवण्यात आली होती. सुमारे ५० फूट खोल असलेल्या या विहिरीला न भरता त्यावर लिंटर टाकून फरशी बसवण्यात आली होती.