वयाच्या १५ व्या वर्षी वडील वारले, १६ व्या वर्षी लग्न; गृहिणीने मशरूम शेतीत कमावलं मोठं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:42 IST2025-01-11T17:41:49+5:302025-01-11T17:42:16+5:30
एका गृहिणीने तिच्या मेहनतीने मशरूम शेतीत मोठं नाव कमावलं आहे. प्रतिभा झा असं या या महिलेचं नाव आहे.

फोटो - kisantak
कठोर परिश्रम आणि समर्पणाने कोणतंही काम केलं की, यश निश्चितच मिळतं. एका गृहिणीने तिच्या मेहनतीने मशरूम शेतीत मोठं नाव कमावलं आहे. प्रतिभा झा असं या या महिलेचं नाव आहे. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. सासू-सासऱ्यांची जबाबदारी आली. पण हार मानली नाही. मशरूम शेतीचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. यामध्ये पतीचा पूर्ण पाठिंबा मिळाला. प्रतिभा यांनी ५०० रुपयांपासून मशरूम शेती सुरू केली आणि आज उत्पन्न लाखोंमध्ये आहे.
प्रतिभा झा १५ वर्षांच्या असताना त्यांचे वडील गेले. त्याच्या वडिलांचं कॅन्सरने निधन झालं. त्यांचे वडील कृषी विभागात काम करायचे. त्या १६ वर्षांच्या झाल्या तेव्हा घाईघाईत त्यांचं लग्न करण्यात आलं. त्यांचे लग्न दरभंगाच्या मिर्चपूर हंसी गावात झालं होतं. त्यावेळी त्या दहावीत शिकत होत्या. लग्नानंतर त्यांना शिक्षण सोडावं लागलं.
प्रतिभा यांचे पती इंजिनिअर होते. लग्नानंतर त्यांची हैदराबादला बदली झाली आणि प्रतिभा त्यांच्यासोबत नवीन शहरात गेल्या. पण काही काळानंतर सासरच्या घरी परत आल्या. या काळात मशरूमची शेती करण्याचा विचार आला. पण सासरच्या घरात यासाठी पाठिंबा मिळाला नाही. जेव्हा त्या पतीशी बोलल्या तेव्हा त्यांनी प्रतिभा यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. यानंतर प्रतिभा यांचा मशरूम शेतीचा प्रवास सुरू झाला.
कृषी विभागात घेतलं ट्रेनिंग
प्रतिभा यांनी मशरूम लागवडीबद्दल जाणून घेण्यासाठी दरभंगा कृषी विभागाशी संपर्क साधला. पण त्यांना भागलपूर कृषी विद्यापीठात (BAU) जाण्याचा सल्ला देण्यात आला. २०१६ मध्ये, त्यांनी या विद्यापीठात शेतीच्या मूलभूत गोष्टी शिकल्या. ट्रेनिंगनंतर शेती सुरू केली.
सुरू केला व्यवसाय
प्रतिभा यांनी ५०० रुपयांपासून मशरूम शेती सुरू केली. त्या जुन्या घरातील एका खोलीचा वापर शेतीसाठी करत असे. त्यांनी सुरुवातीला मशरूम स्पॉन, पॉलिथिन पिशव्या, फॉर्मेलिन आणि कच्चा माल खरेदी केला. पहिल्यांदा त्यांना शेतीतून फारसं उत्पन्न मिळालं नाही. पण त्यांचं मनोबल निश्चितच वाढलं.
प्रतिभा यांनी मशरूमची शेती सुरूच ठेवली. सुरुवातीला त्यांना स्पॉनसाठी इकडे तिकडे धाव घ्यावी लागत असे. पण कायमस्वरूपी उपायासाठी त्या दिल्लीतील पुसा विद्यापीठाकडे वळल्या. १५ दिवसांच्या प्रशिक्षणात त्यांना स्पॉन कसे तयार करायचे हे शिकवलं. यानंतर, त्यांना मशरूम शेतीतून चांगले पैसे मिळू लागले.
प्रतिभ यांची बक्कळ कमाई
प्रतिभा झा ट्रेनिंग सेशनमधून दरमहा ४० हजार ते ५० हजार रुपये कमवतात. याशिवाय मशरूम स्पॉनच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये उत्पन्न मिळतं. तस्चे दररोज १५-२० किलो मशरूम विकतात. ज्यामुळे दरमहा १५ हजार ते २० हजार रुपये मिळतात. प्रतिभा इतर शेतकऱ्यांकडून कमी किमतीत मशरूम खरेदी करतात आणि विकतात. आतापर्यंत १० हजार शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं आहे.