घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 07:36 IST2025-08-07T07:35:57+5:302025-08-07T07:36:22+5:30
एक मृतदेह बाहेर काढण्यात यश; अनेक जण अडकल्याची भीती...

घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
उत्तरकाशी/सिमला : उत्तराखंडच्या धराली गावात बुधवारी सूर्यास्त झाला तेव्हा १५० जणांना वाचविण्यात आले व एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. ढिगाऱ्याखाली अनेक घरे, झाडे, कार गाडल्या गेल्यामुळे अनेक जण अद्यापही अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर हिमाचल प्रदेशात तुफान पाऊस झाल्यानंतर किन्नौर कैलास यात्रा स्थगित करण्यात आली व अडकलेल्या ४१३ जणांची सुटका करण्यात आली.
उत्तराखंडच्या धरालीमध्ये एनडीआरएफ पथक मदतीसाठी पोहोचले. अडकलेल्यांना शोधण्यात सतत कोसळणारा पाऊस व रस्ते खचण्याच्या घटनांमुळे आयटीबीपी, लष्कर व एसडीआरएफ कर्मचाऱ्यांना अडथळे येत होते. अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराची आयबेक्स ब्रिगेड आता रडारची मदत घेणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून स्थितीची माहिती घेतली व मदतीचे आश्वासन दिले. धराली भागाची मुख्यमंत्री धामी यांनी हवाई पाहणी केली.
कसौलीमध्ये १४५ मिलीमीटर पाऊस
हिमाचलच्या इतर भागातही जोरदार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे चार राष्ट्रीय महामार्ग व ६१७ रस्ते बंद झाले आहेत. यातील ३७७ रस्ते मंडी जिल्ह्यातील आहेत.
केरळचे २८ पर्यटक बेपत्ता
केरळचे २८ पर्यटक बेपत्ता झाले आहेत. नैसर्गिक संकटाच्या दिवशी सकाळी ८:३०च्या सुमारास ते उत्तरकाशीहून गंगोत्रीला जात होते. त्या मार्गावर भूस्खलन झाले. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे त्यांच्या एका नातेवाइकाने सांगितले.
भावाचे कुटुंब बेपत्ता
एकाने सांगितले की, माझा धाकटा भाऊ, त्याची पत्नी व त्याचा मुलगा धरोली येथे राहतात. काल दुपारी २ वाजता त्यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यानंतर संपर्क होत नाही. त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बचाव पथकाने माहिती देताना सांगितले.
१,६२६ लोकांचा मृत्यू एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत पाऊस आणि वीज पडल्यामुळे देशात झाला आहे.
५२,३६७ जनावरांचा मृत्यू पाऊस आणि वीज पडल्याने झाला.
१,५७,८१७.६
हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान.
पाय धुवायला गंगा आली तुमच्या दारापर्यंत
पाय धुवायला गंगा तुमच्या दारापर्यंत आली आहे, असे उत्तर प्रदेशचे मत्स्यपालन मंत्री संजय निषाद कानपूर देहातच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यात एका महिलेला म्हणाले. विरोधकांनी टीका करताना म्हटले आहे की,निषाद यांनी असंवेदनशीलता दाखविली आहे.
का येतो अचानक पूर?
हिमालयीन प्रदेशात अचानक येणारे पूर (फ्लॅश फ्लड) हे प्रामुख्याने त्या भागातील भूपृष्ठाच्या वैशिष्ट्यांमुळे घडतात तसेच पश्चिम किनारपट्टी आणि मध्य भारतात होणारे पूर पाण्याच्या प्रवाहावर परिणाम करणाऱ्या घटकांमुळे निर्माण होतात असा निष्कर्ष आयआयटी गांधीनगरच्या संशोधकांनी एका अभ्यासाद्वारे काढला आहे.
अनियंत्रित बांधकामे, पर्यटन, मानवी हस्तक्षेपाने हे संकट
अनियंत्रित बांधकामे आणि मानवी हस्तक्षेपामुळे पुराचे मानवी संकट कोसळले आहे. हिमालयाच्या ४,१७९ वर्ग किलोमीटर परिसरात अनियंत्रित विकासकामे होत आहे. भागीरथी नदीच्या परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे संकट ओढवत आहे.
नैसर्गिक प्रवाहाच्या परिसरात अनियंत्रित बांधकामे होत असून, त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. पर्यटनातून वारेमाप पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जात आहेत, त्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.