Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:54 IST2025-12-17T17:53:07+5:302025-12-17T17:54:54+5:30
Tamil Nadu Gangrape: नोकरी सोडली म्हणून एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
नोकरी सोडल्याच्या रागातून कंत्राटदाराने दोन अल्पवयीन मुलाच्या मदतीने असाम येथील एका महिलेवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. तामिळनाडूच्या श्रीवाकुंटम परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, अशीही ग्वाही पोलिसांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका ठिकाणी नोकरी करत होती. काही वैयक्तिक कारणांमुळे तिने नुकतीच आपली नोकरी सोडली. मात्र, तिने नोकरी सोडल्याचा राग संबंधित कंत्राटदाराला होता. दाम्पत्य रिक्षाने केरळला जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि वाटेतच त्यांना अडवले. आरोपींनी आधी पतीला बेदम मारहाण केली आणि त्याला एका झाडाला घट्ट बांधून ठेवले. त्यानंतर पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्जनस्थळ असल्याने त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही.
आरोपींनी या कृत्यानंतर पीडित दांपत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिला आणि तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. केवळ नोकरी सोडली म्हणून एखाद्या महिलेच्या अब्रूला हात घालण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.