गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसली भरधाव बुलेरो; तिघांचा मृत्यू, २२ जखमी, चालकाला पकडून दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:31 IST2025-09-03T12:19:27+5:302025-09-03T12:31:44+5:30
छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात तीन गणेश भक्तांचा जागीच मृत्यू झाला.

गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसली भरधाव बुलेरो; तिघांचा मृत्यू, २२ जखमी, चालकाला पकडून दिला चोप
Chhattisgarh Accident:छत्तीसगडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. भरधाव गाडी मिरवणुकीत घुसल्याने तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. यावरुन गाडीचा वेग किती होता याचा अंदाज लावता येईल. जखमींमध्ये अनेक मुले आणि महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तर गंभीर जखमींना उपचारासाठी अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.
या अपघातानंतर तिथल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. जमावाने गाडीच्या चालकाला पकडून बेदम मारहाण केली ज्यामुळे तोही जखमी झाला. पोलिसांनी आरोप चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
छत्तीसगडमधील जशपूरमध्ये घडलेल्या या अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका अनियंत्रित गाडीने अनेक भाविकांना चिरडले. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जशपूरमधील चरैदंड बागीचा राज्य महामार्गाजवळ गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढली होती. विसर्जनासाठी सुमारे १५० भाविकांची गर्दी होती. त्यावेळी अचानक एक भरधाव बोलेरो अनियंत्रित होऊन गर्दीत घुसली आणि अनेकांना चिरडले.
छत्तीसगढ़ | जशपुर में कल रात एक तेज़ रफ़्तार अनियंत्रित कार गणेश प्रतिमा विसर्जन जुलूस में घुस गई, जिससे तीन लोगों की मौत हो गई और 22 घायल हो गए। कार चालक को पकड़ लिया गया है: जशपुर एसपी शशिमोहन सिंह
— ANI_HindiNews (@AHindinews) September 3, 2025
या अपघातात एका महिलेसह ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. १९ वर्षीय अरविंद करकेट्टा, १७ वर्षीय विपिन आणि ३२ वर्षीय खिरोवती अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या जमावाने बोलेरो चालकाला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या २२ लोकांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातून १८ जणांना अंबिकापूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, ज्यात कारचा चालकही आहे.