ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 22:02 IST2024-01-09T22:00:59+5:302024-01-09T22:02:07+5:30
या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे छापेमारी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानेपश्चिम बंगाल राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी (९ जानेवारी) ही माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती राज्य सरकारने लवकरात लवकर द्यावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी ५ जानेवारीची घटना जनक्षोभातून घडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.पश्चिम बंगालचे कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी दावा केला की तपास यंत्रणा छापे टाकणाऱ्या देशाच्या इतर भागातही असे हल्ले होतील.
एका कार्यक्रमात शोभनदेब चट्टोपाध्याय म्हणाले, "राज्यात एका ठिकाणी जनक्षोभाचा स्फोट आम्ही पाहिला... भविष्यात भारतात इतर ठिकाणीही अशा घटना घडतील." मंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार दिलीप घोष म्हणाले की, जनता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला वाचवायचे असेल तर सत्तेतून ताबडतोब हकालपट्टी करावी.
ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकरण
गेल्या 5 जानेवारीला ईडीचे पथक राज्याच्या रेशन व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या संदर्भात संदेशखळी येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले होते, तेव्हा शेख यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, ईडीने सांगितले होते की, आमच्या तपासादरम्यान अनेक लोकांनी ईडी टीम आणि सीआरपीएफ जवानांवर एका कंपाउंडमध्ये त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हे लोक काठ्या, दगड, विटा अशा शस्त्रांस्त्रे घेऊन तयार होते.