देशात पहिल्यांदाच होणार ई-जनगणना! अमित शाहांची मोठी घोषणा; गृह खातं लागलं कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 20:07 IST2022-05-09T20:04:46+5:302022-05-09T20:07:40+5:30
ई-जनगणनेमुळे अधिक विश्वासार्ह आणि अचूक माहिती गोळा होईल; शाह यांना विश्वास

देशात पहिल्यांदाच होणार ई-जनगणना! अमित शाहांची मोठी घोषणा; गृह खातं लागलं कामाला
नवी दिल्ली: जनगणना अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. पुढील जनगणना ई-जनगणना असेल. त्यामुळे जनगणना शत-प्रतिशत योग्य होईल, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
गुवाहाटीतील अमीगावात अमित शाहांनी जनगणना केंद्राचं उद्घाटन केलं. १८ वर्षांवरील व्यक्तींचं नाव मतदारयादीत जोडण्यात येईल आणि मृत्यूनंतर व्यक्तीचं नाव हटवण्यात येईल. यामुळे नाव/पत्ता बदलणं सोपं होईल. सगळ्याच नागरिकांचा यामध्ये समावेश होईल, अशी माहिती शाह यांनी दिली.
जन्म आणि मृत्यू नोंदणीला जनगणनेसोबत जोडण्यात येईल. २०२४ पर्यंत प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी होईल. त्यामुळे देशाची जनगणना आपोआप अपडेट होईल. पुढील ई-जनगणना येणाऱ्या २५ वर्षांच्या धोरणांना आकार देईल, असं शाह म्हणाले. सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यावर मी आणि माझं कुटुंब सर्वप्रथम ऑनलाईन तपशील भरू, असं त्यांनी सांगितलं.
धोरण निर्मितीत जनगणनेची महत्त्वाची भूमिका असते. विकास, एससी, एसटीची स्थिती नेमकी काय आहे, ते जनगणनाच सांगू शकते. डोंगराळ भागात, शहरांमध्ये, गावांमध्ये लोकांची जीवनशैली कशी आहे, याची माहिती जनगणतेनूच समजते, असं शाह म्हणाले.