'त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय', हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी अरविंद केजरीवालांवर का भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:29 IST2025-01-28T12:27:55+5:302025-01-28T12:29:46+5:30
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवालांनी हरयाणाला ओढल्याने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पलटवार केला. केजरीवालांचा दावा सैनी यांनी फेटाळून लावला.

'त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय', हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी अरविंद केजरीवालांवर का भडकले?
Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून, राजकीय वार-प्रतिवाराच्या फैऱ्या झडत आहेत. दिल्लीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणाला ओढल्याने हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी भडकले. अरविंद केजरीवालांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे, असे म्हणत त्यांनी पलटवार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता यमुनेच्या दूषित पाण्याचाही मुद्दाही ऐरणीवर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या विषारी पाण्यासाठी हरयाणा जबाबदार असल्याचा आरोप केला. हरयाणामधून यमुना पात्रात विषारी पाणी सोडले जात असल्याचा दावा केजरीवालांनी केला.
हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
अरविंद केजरीवालांच्या विधानाला हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी उत्तर दिले. केजरीवालांच्या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्री सैनी म्हणाले, 'केजरीवालांनी सांगावं की, कोणते विष टाकले गेले. किती टन विष टाकले गेले?'
'नीच राजकारणात केजरीवालांची बरोबरी करू शकत नाही'
"दिल्ली हरयाणा सीमेवर पाणी कसे रोखले आहे? भिंत बांधली आहे. कुठे बनवली आहे? जर पाणी विषारी आहे, तर त्या पाण्यात किती मासे मरण पावले. नीच आणि खोटे राजकारण करण्यात केजरीवालांची कोणी बरोबरी करू शकत नाही", अशा शब्दात मुख्यमंत्री सैनी यांनी केजरीवालांवर हल्ला चढवला.
मुख्यमंत्री सैनी यांनी केजरीवालांवर हरयाणाचा अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "केजरीवालांनी त्या मातीचा अपमान केला आहे, जिथे त्यांचा जन्म झाला आहे."
#WATCH | Haryana CM Nayab Singh Saini says, "It is his (Arvind Kejriwal) habit and thinking to allege and then run away... I said that you (Arvind Kejriwal) sent your chief secretary and I will ask my chief secretary to check the quality of water at Sonipat from where it (Yamuna)… https://t.co/BeFd9d8c5Zpic.twitter.com/a9giLDeKPj
— ANI (@ANI) January 27, 2025
"हरयाणातील लोक यमुनेला पवित्र नदी मानतात आणि तिची पूजा करतात. हरयाणाचे लोक मग नदीत विषारी पाणी का मिसळवतील? अरविंद केजरीवाल यांनी २०२० मध्ये खोटं आश्वासन दिले होते की, जर यमुन नदीला दूषित होण्यापासून वाचवू शकलो नाही, तर परत मत मागणार नाही", अशी टीकाही मुख्यमंत्री सैनी यांनी केली.
मुख्यमंत्री सैनी म्हणाले, "निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने केजरीवालांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे. केजरीवालांनी लगेच हरयाणा आणि दिल्लीतील लोकांची माफी मागायला हवी. नाहीतर आम्ही मानहानीचा दावा दाखल करू", असा इशाराही सैनी यांनी दिला आहे.