'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:50 IST2025-12-11T13:45:55+5:302025-12-11T13:50:49+5:30
Rahul Gandhi Amit Shah: लोकसभेतमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राहुल गांधी यांच्यात खडाजंगी बघायला मिळाली. अमित शाहांच्या याच भाषणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
निवडणूक सुधारणांवरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी खडाजंगी बघायला मिळाली. माझ्या पत्रकार परिषदेत आपण खुली चर्चा करू. मी तुम्हाला आव्हान देतो, असे राहुल गांधी म्हणाल्यानंतर शाहांनी आक्रमक होत उत्तर दिले होते. याच उत्तराबद्दल गुरुवारी राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे.
संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "अमित शाह काल घाबरलेले होते. त्यांनी चुकीची भाषा वापरली. त्यांचे हात थरथरत होते. ते मानसिकदृष्ट्या दबावाखाली होते, हे काल संसदेमध्ये दिसले."
"मी ज्या गोष्टी मांडल्या, त्यावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. कोणताही पुरावा दिला नाही. मी काल त्यांना आव्हान दिलं होतं की, या सभागृहामध्ये माझ्या पत्रकार परिषदांवर चर्चा करूयात. पण, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही", असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.
लोकसभेत काय झालं होतं?
लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधकांच्या बाकांवरून सतत गदारोळ केला गेला. राहुल गांधी यांनी शाह यांना थेट पत्रकार परिषदांवर सभागृहात चर्चा करण्याचे आव्हान दिल्याने अमित शाह आणि राहुल गांधी यांच्यात खडाजंगी झाली. यानंतर काही काळाने विरोधकांनी वॉकआऊट केला.
मी गेल्या ३० वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत आहे. संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही. मी माझ्या भाषणाचा क्रम ठरवेन, असा हल्लाबोल शाह यांनी केला.
तुम्ही जगभरात भारताची प्रतिमा खराब करत आहात
अमित शाह म्हणालेले की, "राहुल गांधी मतदार यादीतील त्रुटींबद्दल बोलत आहेत आणि निवडणूक आयोग अशा चुका दुरुस्त करण्यासाठी एसआयआर करत आहे. तुम्ही जगभरात भारताच्या लोकशाहीची प्रतिमा खराब करत आहात. जर मतदार यादीत त्रुटी असतील तर तुम्ही शपथ का घेतली? ते म्हणाले, त्यांच्या काळात संपूर्ण मतपेट्या हायजॅक होत होत्या. ईव्हीएमच्या वापराने हे थांबले."