हिंदूंनी ३ मुलं जन्माला घालावीत, मंदिरांवरील सरकारचं नियंत्रण हटावं अन्...! कुंभ मेळ्यात VHPच्या बैठकीतील ५ महत्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:52 IST2025-01-25T11:51:09+5:302025-01-25T11:52:14+5:30
यावेळी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा विचार करत समाजाला मार्गदर्शन केल्याचे उपस्थित काही संतांनी सांगितले...

हिंदूंनी ३ मुलं जन्माला घालावीत, मंदिरांवरील सरकारचं नियंत्रण हटावं अन्...! कुंभ मेळ्यात VHPच्या बैठकीतील ५ महत्वाचे निर्णय
VHP Meeting Mahakumbh Mela: विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या वतीने महाकुंभ मेळ्याच्या परिसरात शुक्रवारी एका बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीन अणेक महत्वाचे निर्मय घेण्यात आले. या बैठकीला देशातील अनेक प्रमुख संत उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा विचार करत समाजाला मार्गदर्शन केल्याचे उपस्थित काही संतांनी सांगितले.
बैठकीत घेण्यात आले हे मुख्य निर्णय -
- बैठकीत देशभरातील हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी जागरण अभियान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून हे अभियान सुरूही झाले आहे. यावेळी, सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत, सरकारी नियंत्रण स्थापित करणारे कायदे रद्द करावेत आणि मंदिरांचे व्यवस्थापन श्रद्धाळू भक्तांकडे सोपवावे, असे संतांनी म्हटले आहे.
- दुसऱ्या निर्णयात समाजातील घटत्या जन्मदराचासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. लोकसंख्येतील असंतुलनावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लोकसंख्या संतुलित राहावी यासाठी हिंदू कुटुंबांनी किमान तीन मुले जन्माला घालावीत, असे म्हणण्यात आले आहे.
- यावेळी, वक्फ बोर्डाच्या निरंकुश आणि अमर्याद अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणांचे स्वागत करण्यात आले. तसेच, हा कायदा मंजूर करावा असे म्हणण्यात आले आहे.
- १९८४ च्या धर्म संसदेपासून, संत समाज, हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि संघ अयोध्या, मथुरा आणि काशी येथील तिन्ही मंदिरांच्या प्राप्तीसाठी काम करत आहे. (यांपैकी अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारण्यात आले आहे.) हे काम असेच सुरू राहील, असा पुनरुच्चारही मार्गदर्शक मंडळाने केला.
- संतमंडळींनी, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय चारित्र्य आदींच्या विकासासाठी समाजाने पुढे यावे असेही म्हटले आहे.
या बैठकीला आचार्य अवधेशानंद गिरी, अध्यक्षस्थानी आचार्य महामंडलेश्वर विशोकानंद, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार, केंद्रीय सरचिटणीस बजरंग लाल बागडा आदी उपस्थित होते.